समीर वानखेडे जन्माने मुस्लिम; महापालिकेने उच्च न्यायालयात दिले प्रतिज्ञापत्र!

मुंबई (वृत्तसंस्था) ड्रग्ज पार्टी प्रकरणी कारवाई करणारे मुंबई NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासमोरील अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता समीर वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी त्याचा जन्मदाखला हा ‘फर्जीवाडा’ असल्याचा आरोप केला आहे. आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे समीर वानखेडे जन्माने मुस्लिम की हिंदू हा नवा वाद पुढे आला आहे.
माहितीनुसार एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. महापालिकेने तशी कागदपत्रे कोर्टात सादर केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पालिकेच्या दाव्यानुसार समीर वानखेडे जर मुस्लिम असतील तर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
समीर वानखडे जन्मापासून मुस्लिम?
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने आरोप होत असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. या प्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. वानखेडे यांच्या कागदपत्रात समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचं मुंबई महापालिकेने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
वानखेडेंच्या वकिलाला कागदपत्रं दिली.
दरम्यान याप्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात उद्या इन चेंबर सुनावणी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या सुनावणीवेळी समीर वानखेडे यांच्या वकिलांनाही ही कागदपत्र दिली जाणार आहे. त्यामुळे वानखेडे यांच्याकडून काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.