एसटीचा भाडेवाढ होणार;प्रवाशांच्या खिशाला बसणार झळ!

मुंबई (प्रतिनिधी) एसटीच्या तिकिट दरात तब्बल 17 टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाकडे 4 महिन्यांपूर्वीच तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, त्यावेळी हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला नव्हता. आता नव्याने हा प्रस्ताव प्राधिकरणाकडे उद्या (सोमवारी) सादर केला जाणार आहे.
एसटी महामंडळाच्या तिजाेरीत खडखडाट असतानाच, कोरोनाचे संकट कोसळले. त्यामुळे महामंडळाला तब्बल 12 हजार 500 कोटी रुपयांचा तोटा झाला. दुसरीकडे इंधन दरवाढ, टायरचे दर, कर्मचाऱ्यांचा पगार, सुटे भागांच्या दरातही वाढ झाली..
गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. एसटीला आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी तिकिट दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही. या भाडेवाढीला विविध संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.
राज्य परिवहन प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची सोमवारी (ता. 25) बैठक होणार आहे. सध्या 17 टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव असला, तरी एसटी महामंडळ नेमकी किती दरवाढ करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
▶️ ट्रॅव्हल्सकडून मोठी भाडेवाढ–
दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्स चालकांनी 20 ते 25 टक्के भाडेवाढ केलीय. काही वेळा ट्रॅव्हल्सचालक प्रवाशांकडून दुप्पट भाडे घेतात. इंधन दरवाढीमुळे भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ट्रॅव्हल्स चालकांचे म्हणणे आहे.