चोपड्याच्या अनिलराज पाटील यांच्या चित्रांची आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड!

चोपडा (प्रतिनिधी) हार्मनी आर्ट टीम तर्फे आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धा आणि प्रदर्शन – २०२१ साठी चोपड्यातील युवा कलावंत अनिलराज पुनमचंद पाटील यांच्या १२ चित्रांची निवड झाली आहे. त्यांना संस्थेचे संचालक भगवंतलाल यांच्याकडून ‘सर्टिफिकेट ऑफ विनिंग’ नुकतेच ऑनलाइन प्रदान करण्यात आले.
विद्यार्थी, हौशी आणि व्यावसायिक कलावंतांसाठी आयोजित या स्पर्धेचा मुख्य विषय ‘श्री गणेश’ हा होता. जगभरातून अनेक विद्यार्थी, हौशी आणि व्यावसायिक कलावंतांनी यात सहभाग घेतला होता. अनिलराज पाटील यांच्या १२ कलाकृतींचे एकल प्रदर्शन लवकर हार्मनी आर्ट टीमतर्फे आयोजित करण्यात येणार आहे.
अनिलराज पाटील यांनी चोपडा येथील ललित कला केंद्रातून कलेचे शिक्षण घेतले आहे. ते मासिके, पत्रिकांसाठी विवीध विषयांवर आकर्षक चित्रे, रेखांकने करत असतात. तालुका तसेच जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये बोलक्या भिंती, डिजिटल स्कूल यासाठी त्यांनी आशयानुरुप चित्रे व रेखांकने केलेली आहेत. पेन अँड इंक या कलाप्रकारात त्यांना विशेष रुची आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
