आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनी चोपड्यातील शिक्षकांचा गौरव!

चोपडा(प्रतिनिधी)स्वीडन येथील इको ट्रेनिंग सेंटर तर्फे कोरोना काळात भारत आणि बांगलादेशातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया-बांगलादेश टेलीकोलॅबरेशन प्रोजेक्ट’मध्ये सहभागी होऊन उत्तम प्रदर्शन करणाऱ्या चोपड्यातील सहा शिक्षकांना प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. ५ ऑक्टोबर,आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनी ऑनलाईन संपन्न झालेल्या कार्यक्रमात संजय बारी (महिला मंडळ माध्यमिक विद्यालय), मोहन चव्हाण (स्वा. सै. शा. शि. पाटील माध्यमिक विद्यालय, वर्डी), अतुल भट (प्रताप विद्या मंदिर), जगदीश पाठक (पू. साने गुरुजी विद्यालय, वडती), असलम अली असगर अली (मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल) व पंकज शिंदे (प्रताप विद्या मंदिर) यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास इको ट्रेनिंग सेंटरचे सेक्रेटरी जनरल डॉ एजात हसन (स्वीडन), आंतरराष्ट्रीय समन्वयक डॉ सेहम सय्यद (इजिप्त) यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे राष्ट्रीय समन्वयक प्रा. योगेश सोनवणे (पुणे), बांगलादेशच्या राष्ट्रीय समन्वयक आयेशा सिद्दिका यांची प्रमुख उपस्थिती होती.
इको ट्रेनिंग सेंटर (स्वीडन), महाराष्ट्र शासन, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (नाशिक), शिक्षण विभाग – जिल्हा परिषद जळगाव आणि बांगलादेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंडिया बांगलादेश टेली कोलॅबरेशन प्रोजेक्ट’ अंतर्गत संयुक्त राष्ट्र संघटनेने निश्चित केलेल्या १७ शाश्वत विकासाच्या ध्येयांपैकी ७ ध्येयांवर भारत आणि बांगलादेशातील शिक्षकांमध्ये विचार, अनुभव आणि पद्धतींचे आदान प्रदान करण्यात आले. एकूण १५ सत्रांमध्ये संपन्न झालेल्या या उपक्रमात झूम, गूगल मीट, युट्युब, फेसबूक या समाज माध्यमांचा वापर करण्यात आला. प्रकल्पपूर्व चाचणी, प्रकल्पोत्तर चाचणी, मेंटीमीटर याद्वारे या प्रकल्पाचे मूल्यांकन इको ट्रेनिंग सेंटर (स्वीडन) द्वारे करण्यात येऊन प्रकल्प पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या १५ चर्चासत्रांमध्ये पावर पॉइंट प्रेझेंटेशन, व्हिडिओ बनविणे, छायाचित्रे याद्वारे विषयानुरूप माहिती सादर करून परस्परांत देशातील संस्कृती, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
शाश्वत विकास ध्येये (एस.डी.जी.) हा भविष्यकालीन आंतरराष्ट्रीय विकास संबंधित ध्येयांचा संच आहे. ही ध्येये संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) निश्चित केली आहेत. २०१५ च्या ऑगस्ट मध्ये १९३ देशांनी पुढील १७ ध्येयांना मान्यता दिली आहे. दारिद्रय निर्मुलन, भूक निर्मुलन, चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, शुद्ध पाणी आणि आरोग्य्दायक स्वच्छता, नूतनीकरण करण्याजोगी आणि स्वस्त ऊर्जा, चांगल्या नोकर्या आणि अर्थशास्त्र, नवीन उपक्रम आणि पायाभूत सुविधा, असमानता कमी करणे, शाश्वत शहरे आणि समाज, उपलब्ध साधनांचा जबाबदारीपूर्वक वापर, हवामानाचा परिणाम, शाश्वत महासागर, जमिनीचा शाश्वत उपयोग, शांतता आणि न्याय, शाश्वत विकासासाठी भागिदारी ही १७ ध्येये असून सन २०१५ पासुन सन २०३० पर्यंत ही ध्येये लागू पडतील. एकूण १७ ध्येयांसाठी १६९ विशिष्ट ध्येये स्पष्ट करण्यात आली आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रकल्पातील उल्लेखनीय सहभागाबद्दल या शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.