अमळनेर शहरातील पाणी तुंबण्याचा प्रश्न आ.अनिल पाटील सोडविणार!

▶️ निचऱ्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा,जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पत्र
अमळनेर (प्रतिनिधी) सततच्या पावसामुळे अमळनेर नगरपरिषद हद्दीतील कॉलनी परिसरात सतत तुंबणाऱ्या पाण्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाल्याने आ.अनिल पाटील यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून तुंबणाऱ्या पाण्याचा लागलीच निचरा होण्यासाठी कायमस्वरुपी उपाय योजना करा असे तातडीचे पत्र आमदारांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांनी खूपच हाल सहन केल्याने आमदारांनी या समस्येने ग्रस्त असलेल्या अनेक कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यानंतर काही खाजगी सिव्हिल इंजिनिअर तसेच शासकीय बांधकाम अभियंत्यांशी चर्चा करून यावर कश्या पद्धतीने उपाययोजना करता येईल याची माहिती जाणून घेत त्याचा आराखडा तयार केला जाणार आहे.तत्पूर्वी प्रशासनाची जवाबदारी महत्वपूर्ण असल्याने आमदारांनी जिल्हाधिऱ्यांना तातडीने पत्र दिले आहे.यात म्हटले आहे की सततच्या पावसामुळे अमळनेर नगरपरिषद हद्दीतील पिंपळे रोड व धुळे रोड दरम्यानच्या शंकर नगर, विठ्ठल नगर, आदर्श नगर, स्वामी विवेकानंद नगर, क्रांती
नगर, एल.आय.सी. कॉलनी, टेलिफोन कॉलनी, उत्कर्ष नगर, समर्थ नगर, संत सखाराम
महाराज नगर या भागात गुढग्याच्यावर पाणी साचते परिणामी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरते तर गल्ल्यांमध्ये कच्चे रस्ते असल्यामुळे मोटारसायकली व चारचाकी वाहन जात नाही.तसेच पाण्यात खड्डे दिसत नसल्यामुळे अपघात होतात.सदरच्या परिसरात दरवर्षी थोड्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे पाणी साचते
त्यामुळे परिसरातील मोकळ्या भुखंडावर 15-20दिवस पाणी तुंबुन राहते त्यामुळे साथीचे रोग
पसरण्याची भिती खुप मोठ्या प्रमाणावर असते व नागरीकांचे आरोग्य धोक्यात येते.तरी कॉलनी परिसरातील तुंबणाऱ्या
पाण्याचा निचरा होण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती आ.अनिल भाईदास पाटील यांनी प्रशासनास केली आहे.