राक्षसी प्रवृत्तीचा वाढलाय अत्याचार; आरोपीनेच केला महिलेवर बलात्कार!

नाशिक (प्रतिनिधी) मुंबईतील साकीनाका, डोंबिवली तील घटना ताजी असताना, नाशिक शहरातही महाराष्ट्राला हादरवून सोडण्याची घटना घडली आहे. शहरातील पवननगर भागात व्यावसायिक महिलेवर एका नराधमाने अत्याचार केला आहे. या नराधमाने महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हात बांधून अत्याचार केला असल्याची फिर्याद पीडित महिलेने पोलिसात दिली आहे.नराधम आरोपी हा सराईत गुन्हेगार असून नाशिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,पीडित महिला ब्युटीपार्लर चालवते. आज सकाळी पीडिता आपल्या पार्लरमध्ये देवाची पूजा करीत असतांना, संशयित आरोपी तिच्या पार्लरमध्ये शिरला. त्यावेळी पार्लरमध्ये दुसरे कुणीही नव्हते. याचाच फायदा घेत नराधम आरोपीनं पार्लरचा दरवाजा आतून बंद करून चाकूचा धाक दाखवत पीडित महिलेसोबत जबरदस्ती केली आहे. नराधमाने पीडित महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हात बांधत अमानुष पद्धतीने तिच्यावर अत्याचार केला आहे.
दरम्यान या संतापजनक घटनेनंतर पीडित महिलेनं धाडस करून अंबड पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी हा अलीकडेच एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान पोलीस आरोपीचा शोध घेत असतानाच त्यानं हा बलात्काराचा गंभीर गुन्हा केला आहे. तसेच आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी चार पथकं तयार केली आहेत. लवकरच आरोपीला अटक करू असं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.