शेती नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने पूर्ण करा!- कृषीमंत्री दादाजी भुसे

0

▶️ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी साधला संवाद
चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह झालेल्या अन्य नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनास सादर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यात येईल, असे राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

चाळीसगाव, भडगाव पाचोरा तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर आणि डोंगरी या नद्यांना पूर आले. त्यात एक महिला वाहून गेली, तर शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री श्री. भुसे यांनी आज सकाळी चाळीसगाव तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडेसह पाचोरा तालुक्यातील दिघी, भोरटेक, कजगाव, ता. भडगाव या गावांना भेट देवून तेथील पूर परिस्थितीची पाहणी करून नागरिकांसह शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे (चाळीसगाव), चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्यासह तीनही तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले, गेल्या काही दिवसांत या भागात दोन वेळा पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीचे व घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल राज्य शासनाने घेतली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर मदतीबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पंचनाम्यांची कार्यवाही प्रशासनाने तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावा. तसेच पावसामुळे शेतीचे जे नुकसान होते. ते टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचाही आढावा घेण्यात येईल, असेही कृषी मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

यावेळेस मंत्री श्री. भुसे यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले व शेतकऱ्यांना धीर दिला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!