प्रेरणादायी: खान्देशचे भूषण; भाऊ आयुक्त आणि बहीण उपायुक्त!

0

“छोटेसे बहिण-भाऊ उद्याला मोठाले होऊ,
उद्याच्या जगाला काळजी कशाला नवीन आकार देऊ”

हे बालगीत आपण सर्वांनी लहानपणी जिल्हा परिषदेच्या शाळेत ऐकले असेल. हेच गीत ऐकून आज दोन बहिण- भाऊ खरच खूप मोठे झाले आहेत. या गोड जोडी चे नाव म्हणजे राजेश पाटील आणि प्रतिभा पाटील.
जळगाव जिल्ह्य़ातील एरंडोल तालुक्यातील ताडे या छोट्याशा गावातून या दोघी भावंडांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. प्रभाकर पाटील आणि इंदू ताई या अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू दाम्पत्याच्या घरात हे दोन ज्ञानपिपासू लेकरं मोठी होत होती. लहानपणापासून परिस्थितीशी संघर्ष करून प्राथमिक ते पदवी पर्यंत शिक्षण दोघी बहिणींनी उत्तम रित्या पूर्ण केले. 2005 मध्ये राजेश पाटील यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस पदासाठी त्यांची निवड झाली.भावाच्या यशातून बहिणीने प्रेरणा घेतली आणि प्रतिभाताई ची सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे नगरपालिका मुख्याधिकारी पदी निवड झाली. विशेष म्हणजे दोघी बहिण-भाऊ नी आपले पदव्युत्तर शिक्षण पुणे येथेच घेतलेले आहे. ज्या शहराने आपल्याला सुशिक्षित केले स्वतःच्या पायावर उभे राहण्याची शक्ती दिली त्या शहरातील जनतेच्या सेवेसाठी दोघे भाऊ-बहिण आता सज्ज आहेत.
राजेश पाटील यांनी आपल्या शासकीय सेवेतील पंधरा वर्ष ओरिसा राज्याची सेवा केली. या सेवेद्वारे ओरिसाच्या जनतेमध्ये एक सन्मानाचे आणि त्यांच्या हृदयात आपलेपणाचे स्थान प्राप्त केले. कोरापुट या आदिवासी जिल्ह्याला अनेक बाबतीत विकसित करण्याचे काम राजेश पाटील यांनी केले.ओरिसा राज्यातील सेवेची दखल घेऊन केंद्र सरकारने राष्ट्रपती पुरस्कार आणि पंतप्रधान पुरस्कार देऊन राजेश पाटील यांचा गौरव केला.पंधरा वर्षे ओरिसा राज्याची सेवा केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने राजेश पाटील यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त पदी नेमणूक केली आहे. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत बहिणीने देखील राज्यातील अतिशय संवेदनशील नगरपालिकांच्या कारभार यशस्वीरित्या सांभाळला आहे. आता प्रतिभा ताई ची पुणे महानगरपालिका उपायुक्त पदी निवड झालेली आहे.
एका खेडेगावातून शेतकऱ्याच्या कुटुंबातून कष्टाची कामे करून मोलमजुरी करून जीवनात यशस्वी होता येते आणि ते सुद्धा कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिकपणे.,याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजेश पाटील आणि प्रतिभा पाटील आहेत. ही दोघी भावंडे म्हणजे खान्देशवासीयांचे साठी अभिमान आहेत.
✍?प्रा.जयदीप पाटील
नोबेल फाऊंडेशन,जळगाव

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!