भुषण महाले यांना सलग तिसऱ्यांदा मायक्रोसॉफ्टचा पुरस्कार!

अमळनेर (प्रतिनिधी) मायक्रोसॉफ्टतर्फे दिल्या जाणाऱ्या “मायक्रोसॉफ्ट इनोव्हेंटीव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट या पुरस्कारासाठी लोकमान्य विद्यालय (ता.अमळनेर) येथील तंत्रस्नेही शिक्षक भूषण सुरेश महाले यांची सलग तिसऱ्या वर्षी निवड करण्यात आली आहे. वर्गातील अध्यापनात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरुन शिक्षण पद्धतीला वेगळे आयाम देणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. भूषण महाले यांनी मायक्रोसॉफ्टच्या विविध टूल्सचा सहाय्याने तसेच टीम्सच्या मदतीने अध्यापन कार्यात नावीन्यता आणली तसेच माक्रोसॉफ्टच्या विविध शैक्षणिक साधने व स्काईप वापरुन अध्यापन रंजक केले आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्यातील जवळजवळ ८०० शिक्षकांना मायक्रोसॉफ्टचे ट्रेनिंग दिले आहे त्याबद्दल भूषण महाले यांना मायक्रोसॉफ्टच्या “मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटीव एज्युकेटर मास्टर ट्रेनर” हा पुरस्कार देखील मागील वर्षी प्राप्त झाला आहे. तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून सलग तिसऱ्यांदा “मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटीव एज्युकेटर एक्स्पर्ट” या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. देशातील व परदेशातील शाळांमध्ये ऑनलाईन पध्दतीने टिचिंग केले जात आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्टने शिक्षक व विद्यार्थ्यांना एक वेगळी अशी संधी उपलब्ध करून दिली आहे. तरी सर्व शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भूषण महाले यांनी केले आहे.