एस.टी.ला 500 कोटींचा निधी; कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार!

मुंबई (वृत्तसंस्था) इंधन दरवाढ, कोरोनाचे संकट नि त्यातून दुरावलेले प्रवासी, यामुळे एसटीचे चाक खोलात रुतत चाललेय. कर्मचाऱ्यांना वेतन देणेही अवघड झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे 600 कोटी रुपयांची मदत मागितली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार, एसटी महामंडळाला 500 कोटी रुपये तातडीने वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील 98 हजार एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाचा प्रश्न सुटणार आहे.
कोरोनामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घटलेय. महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करीत आहे. समितीच्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा झाली.
चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला होता. उर्वरित 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले होते. त्यानुसार तातडीने हा निधी वितरित करण्यात आला.