जळगाव जिल्ह्यात झाल्या,15 लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

0

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या नागरीकांची प्राधान्याने कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत (25 ऑगस्ट) 15 लाख 519 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 42 हजार 690 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या विविध उपायायोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब असली तरी भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हावासियांनी यापुढेही कोरोना नियमांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ट्रीपल टी’ (ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट) वर भर दिला असून यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. याकरीता जिल्ह्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदेच्या क्षेत्रात अंगणवाडी सेविका, आशावर्कर, आरोग्य यंत्रणेमार्फत संशयित रुग्ण शोध मोहिम प्रभावीपणे राबवून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील हायरिस्क व लोरिस्क व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचबरोबर कोरोना सदृश्य लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींच्या चाचणीवर विशेष भर देण्यात आला. जेणेकरुन बाधित रुग्णांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला वेळेत उपचार मिळून रुग्ण लवकर बरा होण्यास मदत झाली.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात आवश्यकतेनुसार कोरोना संशयितांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या 15 लाख 519 व्यक्तींच्या कोरोना चाचण्यांपैकी 13 लाख 55 हजार 662 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 1 लाख 42 हजार 690 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 9 लाख 81 हजार 27 व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली असून यापैकी 84 हजार 808 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर 5 लाख 19 हजार 492 व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून पैकी 57 हजार 882 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तसेच 1 हजार 928 ईतर अहवाल आढळले असून सध्या 239 अहवाल प्रलंबित असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड-19 चे नोडल अधिकारी डॉ एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी त्वरीत निदान, त्वरीत उपचार या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तींस कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी त्वरीत नजिकच्या रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच जिल्हावासियांनी यापुढेही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!