शाळा सुरू करण्याची शासनाची नकार घंटा!

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्यातील ज्या भागात कोरोना रूग्णसंख्या कमी आहे. त्या भागात ऑफलाईल पद्धतीने शाळा सुरू करण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागाने सांगितलं होते. मात्र आता शाळा सुरू करण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या जीआरला स्थगिती दिलीये. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि इतर राज्यात शाळा सुरू झाल्यानंतर झालेले परिणाम या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर या बैठकीत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे.
देशात फक्त 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे. अद्याप लहान मुलांचं लसीकरण केलं गेलं नाही. गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य सांभाळण्यासाठी आम्ही निर्णय घेत आहोत, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून टास्क फोर्सने शाळा सुरू न करण्यावर निर्णय घेत आहे. दहावी आणि खालील वर्गातील विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालं नसल्यानं शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने निर्णयात बदल करत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतलाय.