महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार!- शरद पवार

0

बारामती(प्रतिनिधी)अंतर्गत कुरबुरीमुळे महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही या चर्चेला ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विराम दिला आहे. महाविकास आघाडी सरकार हे काही मुद्यांच्या आधारे स्थापन झाले आहे. धोरणात्मक निर्णय घेताना या सरकारमधील प्रमुख एकत्र येवून चर्चा करतात. त्यामुळे हे सरकार अत्यंत व्यवस्थित चालले असून ते पाच वर्ष टिकेल याबद्दल शंका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मागील काही दिवसात महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत उलटसुलट चर्चा आहेत. यावरही त्यांनी भाष्य करत हे सरकार पाच वर्षे टिकणार असे स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. सरकार चालवताना काही प्रश्न निर्माण होत असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी यंत्रणा असावी अशी चर्चा झाली. त्यानुसार कॉंग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण, शिवसेनेकडून सुभाष देसाई व एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार व जयंत पाटील यांची समिती यावर काम करते. एखादा धोरणात्मक निर्णय घेताना हे सहा सहकारी एकत्र बसून चर्चा करतात. त्यामुळे हे सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरु असून ते पाच वर्षे टिकेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!