श्यामची आई” पुस्तकातील ध्वनिमुद्रित केलेले अभिवाचन “संस्कारक्षम श्रवणकथा” उपक्रम कौतुकास्पद!-तहसीलदार मिलिंदकुमार वाघ

अमळनेर (प्रतिनिधी) पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत संस्कारक्षम उपक्रम राबविणे ही शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. “श्यामची आई” या पुस्तकातील ध्वनिमुद्रित केलेले अभिवाचन केलेला नाविन्यपूर्ण “संस्कारक्षम श्रवणकथा” उपक्रम कौतुकास्पद आहे, असे मत तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी व्यक्त केले. सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच व पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे “श्यामची आई” या पुस्तकातील ४२ रात्रीचे अभिवाचन (ध्वनिमुद्रित) सोशल मीडियावर क्लिक करून शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. पूज्य साने गुरुजी स्मृती दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन साहेब, निवृत्त केंद्रप्रमुख मंगलाताई पाटील, पिंगळवाडे जि.प.उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, शिरूड जि.प.उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील, मठगव्हाण जि. प.शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका छाया इसे व आर्मी स्कुलचे माध्यमिक शिक्षक उमेश काटे आदी उपस्थित होते. कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणाच्या या अनोख्या उपक्रमाचे तहसीलदार श्री वाघ व गटशिक्षणाधिकारी श्री महाजन यांनी कौतुक केले आहे. आर डी महाजन यांनी सांगितले की, कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व अनलॉक काळात प्रत्यक्ष शाळा बंद असल्या तरी बालकांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन व शिक्षकाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. उमेश काटे यांनी सांगितले की, तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी “श्यामची आई” पुस्तकातील कथांचे शिक्षकांच्या माध्यमातून अभिवाचन करुन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची तयारी केली जात असल्याचे सांगितले. उपक्रम संयोजक तथा मंचाचे समन्वयक दत्तात्रय सोनवणे यांनी प्रास्ताविक केले.
▶️ असा आहे उपक्रम
१ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी “श्यामची आई” या पुस्तकातील प्रस्तावना, प्रारंभ व पुढे क्रमश: ४२ रात्रींचे दररोज एक कथा याप्रमाणे ४४ ऑडीबल भाग प्रसारित केले जातील. ११ जून पासून २४ जुलै पर्यंत या संस्कारक्षम अभिवाचन व्हॉटसअपगृपच्या माध्यमातून पाठविले जाणार असून दररोज ऐकता येणार आहे. सदर अभिवाचनाची पोस्ट ऑडीओ क्लिपसह सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक शाळेने आपापल्या शाळेच्या वर्गनिहाय गृपवर पाठविण्यात येणार आहे. केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत ह्या “संस्कारक्षम श्रवणकथा” नियमित पोहोचवाव्या. तसेच शिक्षकांनी याचा वेळोवेळी कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घ्यावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन, उपक्रम संयोजक दत्तात्रय सोनवणे व प्रसिद्धी प्रमुख उमेश काटे यांनी केले आहे.