एरंडोल,पारोळा व भडगांव तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्या!-आमदार चिमणराव पाटील

पारोळा (प्रतिनिधी) एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल, पारोळा व भडगांव तालुक्यात गेल्या २ दिवसांपासून सुसाट्याचा वादळासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या अगोदरच राज्यासह संपूर्ण विश्वात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा भयावह परिस्थितीने बळीराजा चारही बाजूने मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यात या सुसाट्याचा वादळासह अवकाळी पावसामुळे बागायती पिकांसह अन्य पिके जमीनदोस्त झालेली आहेत. यामुळे बळीराजावर खूप मोठे आर्थिक संकट आलेले आहे. एरंडोल, पारोळा व भडगांव तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पिक विमे देखील काढलेले आहेत. परंतु पिक विम्याचा लाभ मिळणेसाठी त्यांना पंचनाम्याची आवश्यकता आहे. म्हणून बळीराजाला धीर देण्यासाठी पिकांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्याकडे केलेली आहे.

