‘तौत्के’ चक्रीवादळाचे रौद्र रूप; गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण!

मुंबई (वृत्तसंस्था) अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम आता संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे.
हवामान विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आज सकाळी या चक्रीवादळानं आणखी रौद्र रूप धारण केलं. या वादळानं ‘व्हेरी सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म’ म्हणजे अतितीव्र चक्रीवादळाची पातळी गाठल्याचं भारतीय वेधशाळेनं जाहीर केलं आहे.
‘इन्सॅट’ उपग्रहानं काढलेला एक फोटो भारतीय हवामान खात्यानं ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात चक्रीवादळाचा केंद्रबिंदू ठळकपणे दिसतो आहे. तौक्ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकणार नसलं, तरी किनाऱ्याला समांतर ते गुजरातकडे जाणार आहे.
तौक्ते चक्रीवादळमुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 24 तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वेगाने वारे वाहतील. किनारपट्टीपासून हे वादळ साधारण 200 ते 300 किलोमीटरवर असेल, पण त्याच्या प्रभावामुळे किनारी प्रदेशात वेगवान वारे, खवळलेला समुद्र आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गुजरातच्या दिशेने हे वादळ मार्गक्रमण करत असून, 18 मेच्या पहाटे गुजरातच्या पोरबंदर जवळून ते जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या 512 नौका सुखरूप समुद्रकिनारी पोहचल्या आहेत.