पोलीस आयुक्त झाले ‘मियाँखान’; वेशांतर करून पोलीस ठाण्यांवरच टाकल्या धाडी!

0

पिंपरी-चिंचवड (वृत्तसंस्था) सिंघम स्टाईल अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरात वेशांतर करून पोलीस ठाण्यांवरच धाडी टाकल्या. वेशांतर करत कृष्णप्रकाश बनले मिया जमालखान कमालखान पठाण. तर या मोहिमेत मियाची बिवी बनल्या सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे. दोघांनी वेशांतर केलं… प्रकाश यांना दाढी, डोक्यावर लालसर रंगाचा विग असा लूकच बदलला. त्यात तोंडावरच्या मास्कमुळं हे दोघं कुणाला ओळखूही आले नाहीत.
या दोन अधिकाऱ्यांनी वेशांतर करून शहरांमधल्या विविध पोलीस ठाण्यांवर धाडी टाकल्या. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. त्यांनी तीन ठिकाणी भेटी दिल्या आणि सत्य परिस्थितीची माहिती घेतली. पाहुयात या मोहिमेमध्ये नेमकं काय घडलं.
▶️ पहिली धाड – रात्री 12 – पिंपरी पोलिस ठाणे
वेशांतर करुन मियाबिवीच्या रुपात ही जोडी रात्री 12 च्या सुमारास खासगी टॅक्सीने पिंपरी पोलिस ठाण्यात आली. शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका हवी होती, पण फोन केला तर 8000 रुपये सांगितले, अशी तक्रार त्यांनी केली. रुग्णवाहिकेवाला आम्हाला अक्षरशः लूटतोय, तक्रार दाखल करून घ्या, असा आग्रह त्यांनी धरला. पण पोलिस आयुक्तांनाही अगदी तसाच अनुभव आला जो सामान्य व्यक्तीला येतो. कारण ते तेव्हा सामान्याच्या वेशात होते. पोलिसांनी हे आमचं काम नाही म्हणत दोघांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मग काय कृष्ण प्रकाश यांनी मास्क काढून खरी ओळख दाखवताच अधिकाऱ्यांची अक्षरशः ततंरली.
▶️ दुसरी धाड – रात्री 1.30 वाजता – हिंजवडी पोलिस ठाणे

यानंतर जोडीनं मोर्चा वळवला हिंजवडी पोलिस ठाण्याकडे. मुस्लीम वेशात असलेल्या कृष्णप्रकाश यांनी इथं एक नवी कहाणी सांगितली. आम्ही रमजानचे उपवास ठेवतो, परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो. त्यामुळं मी बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली, मला कंबरेत लाथा घातल्या, अशी खोटी तक्रार केली. हिंजवडीमध्ये ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्याने गांभीर्याने प्रकरणाची माहिती घेतली. कच्ची फिर्याद तयार केली आणि वरिष्ठांना बोलावतो असं सांगितलं. पण सर्व ड्रामा संपवत आयुक्तांनी ओळख दाखवल्यावर तो कर्मचारी कावराबावरा झाला. मात्र इथं कृष्णप्रकाश आणि कट्टे यांना चांगला अनुभव आला.
वाकडमध्येही या दोघांना फारच चांगला अनुभव आल्याचं कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं. रात्री 2 च्या सुमारास वाकडवरून थेट डांगे चौकातील गस्तीच्या पॉईंटकडे जाताना सर्व कर्मचारी रस्त्यावर हातात काठी घेऊन प्रत्येक वाहनाची तपासणी करताना दिसले. मात्र आम्ही वेशांतर करून फिरतोय ही बातमी परल्याने हा प्रामाणिकपणा दाखवत कर्तव्यावर असल्याचं आव अधिकारी आणत असल्याचंही नजरेतून सुटलं नाही असं कट्टे म्हणाल्या.
एकूणच वेशांतर करून केलेली शहराची सफर दोघांसाठी थोडी खुशी थोडा गम देणारी ठरली. पोलीस कर्मचारी कसे काम करतात. नागरिकांना कशी वागणूक देतात याची तपासणी करण्यासाठी यापुढंही अशाच धाडी टाकणार असल्याचं ते म्हणाले. समाजाला त्रास होणारे काळे धंडे बंद व्हायलाच हवे, हा मुख्य उद्देश अशल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी अचानक कुठेही कधीही छापे टाकणार असल्याचं ते म्हणाले. जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. शहर भयमुक्त करायचे आहे… पोलिसांबद्दल जनतेच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण कऱणे… पोलिस लोकाभिमुख व्हावा आणि शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी अधिक आक्रमक पावले उचलणार असल्याचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!