राज्यातील शाळांना १ मे पासून सुट्टी!

0

मुंबई (वृत्तसंस्था) मागील महिन्यापासून राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना रोगाने हाहाकार माजवला आहे. यामुळे वर्षाच्या सुरुवातीला सुरळीत झालेले जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. २०२० च्या मार्च मध्ये कोरोना रोगामुळे टाळेबंदी करण्यात आली होती. यानंतर मिशन बिगिन अंतर्गत मुंबई वगळता वर्षाच्या अखेरीस राज्यातील पाचवी ते पुढील इयत्तेच्या शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या होत्या.
मात्र, वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता पुन्हा एकदा शाळा बंद करण्यात आल्या असून ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, आता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात आले आहे. तर, शिक्षकांचे शाळेतील इतर काम व ऑनलाईन वर्ग मात्र सुरु होते. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष समाप्त करून १ मे पासून राज्यातील शिक्षकांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी शिक्षण संघटनेकडून करण्यात आली होती.
आता, १ मे पासून १३ जूनपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने सर्व शिक्षण संचालकांना पत्र पाठवून याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या पत्रानुसार, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालयानामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती केली जाते. त्यानुसार शनिवार १ मे पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली असून तिचा कालावधी १३ जून २०२१ पर्यंत आहे. तर २०२१-२२ च्या शाळा सोमवारी १४ जून २०२१ पासून सुरू करण्यात याव्यात. तर विदर्भातील तापमान लक्षात घेता तेथील शाळा २८ जून पासून सुरू होतील.
त्याचसोबत शाळांतून उन्हाळ्याची आणि दिवाळीची दिर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव, नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी समायोजन करण्यात यावे. माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी. सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील सरकारी आणि खासगी प्राथमिक माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ला शाळा सुरू करण्याबाबत कोविड १९ची तत्कालीन परिस्थिती पाहून शासन निर्णय घेईल, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!