दातृत्व सामाजिकतेचे:आ.चिमणराव पाटील यांच्याकडून रुग्ण व नातेवाईकांसाठी भोजन व निवारा व्यवस्था

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे रुग्णासह नातेवाईकांची पारोळा कुटीर रूग्णालयात अधिक गर्दी होत आहे.
एकीकडे रूग्ण रुग्णालयात दाखल असले तरी रूग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बरेच जण ग्रामीण भागातून आल्यामुळे नातेवाईकांची भोजनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी व निवाऱ्यासाठी वणवण फिरावे लागते. पर्यायाने ते गरीब असल्यामुळे त्यांना उपाशीपोटी उघड्यावरच झोपावे लागत होते. यावर आमदार चिमणराव पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्वरीत दखल घेऊन आज पारोळा कुटीर रूग्णालयाच्या आवारात आमदार चिमणराव पाटील यांच्या सौजन्याने रूग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना भोजन, पाणी व निवाऱ्यासाठी निवासी कक्षाची स्थापना करण्यात आली. अन्न, पाणी, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यामुळे रुग्णासोबतच्या नातेवाईकांना आरोग्य व्यवस्थित राहणार आहे.यामुळे रुग्णासह नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.
