गरिबीवर मात करीत ‘बापू भिल’ ने ‘सेट’ परीक्षेत विणले यशाचे जाळे

अमळनेर (प्रतिनिधी) मनात जिद्द, चिकाटी अन काहीतरी वेगळी करण्याची धमक असेल तर अशक्य गोष्ट ही शक्य होते. याची प्रत्यक्ष प्रचिती येथील प्रताप महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी तथा वासरडी (ता.शिरपूर) येथील मूळ रहिवासी बापू सत्तार भिल या युवकाने दिली आहे. आर्थिक परिस्थितीशी दोन हात करीत या युवकाने इंग्रजी विषयात “सेट परीक्षा” उत्तीर्ण केली आहे. या उत्तुंग यशामुळे शिरपूरसह अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बापूचे वडील सत्तार भिल हे शिरपूर तालुक्यातील वासरडी या एका छोट्याश्या गावात हातमजुरी करतात. बापूचे प्राथमिक शिक्षण हे अमळनेर तालुक्यातील लाडगांव येथे तर महाविद्यालयीन शिक्षण अमळनेर शहरात झाले. सध्या तो “बीएड” ला प्रवेशित असून शेवटच्या वर्षाला आहे. आपल्या गरिबीच्या परिस्थितीला बदलायचे असेल तर अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही, यासाठी तो प्रताप महाविद्यालयातील CCMC केंद्रात तो नियमितपणे अभ्यास करीत होता. काल सायंकाळी सेट परीक्षेचा निकाल जाहीर झाला,त्यात बापू ने पहिल्या पेपर ला 40 तर दुसऱ्या पेपर ला 96 गुण प्राप्त करीत इंग्रजी विषयात सेट उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.