वृद्ध सेवानिवृत्त शिक्षकांसाठी 72 लाख ; नगरपरिषद अमळनेरचे अभिनंदन!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगर परिषदेतील वृद्ध सेवानिवृत्त शिक्षकांच्या निवृत्ती व कुटुंब निवृत्तीवेतनासाठी नगर परिषद हिश्श्याची रक्कम 72 लाख रुपये देऊन निवृत्तीवेतन नियमित करण्याचे काम नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड व माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील व सर्व नगरसेवक यांच्या सकारात्मक दृष्टिकोनातून झाल्याने नागरी दक्षता समिती अमळनेर व सेवानिवृत्त शिक्षकांच्या वतीने नगर परिषद अमळनेर चे अभिनंदन केले आहे.
जुलै 2019 पासून नगरपरिषदेची दहा टक्के रक्कम बाकी होती. त्यामुळे नगर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती व कुटुंब निवृत्ती वेतन तीन महिन्यांपासून थकीत होते. सुमारे 125 शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. शिक्षक आर्थिक व मानसिक ताणतणावात होते. सदर निवृत्ती वेतनाचा प्रश्न सेवानिवृत्त शिक्षकांनी नागरी हित दक्षता समिती अमळनेर कडे सोपविला.समितीने माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली.नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या समवेत समिती सदस्यांची बैठक झाली त्यात मार्च 2021 पर्यंत शिक्षकांच्या थकित निवृत्त वेतनाचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन वरील मान्यवरांनी दिले. त्याप्रमाणे नगर परिषद परिषदेने आर्थिक नियोजन करून आतापर्यंत 72 लाख रुपये देऊन शिक्षकांच्या वेदनेशी नातं जोडून कठीण व जटिल प्रश्न मार्गी लावला. दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी राजभवनावर माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील व मुख्याधिकारी डॉक्टर विद्या गायकवाड यांचे हस्ते नगरपरिषद शिक्षण मंडळाचे सुनील पाटील यांना 36 लाख रुपयांचा चेक दिला याप्रसंगी प्रा.अशोक पवार, नगरसेवक मनोज पाटील,सत्तार मास्टर, संजय चौधरी,रवी पाटील आदी उपस्थित होते.