खौशी येथे गव्हाच्या शेताला आग लागल्याने शेतकऱ्याचे नुकसान!

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खौशी येथील शेतकरी भरत महादू पवार यांच्या गावालगतच्या शेताला मंगळवारी (ता.30) दुपारी लागलेल्या आगीत एक एकर गव्हाचे शेत जळून खाक झाले. महावितरणचे पोल वरील तारा खंडीत झाल्यामुळे आग ही लागल्याचे निदर्शनास आले आहे.
गावातील लोकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले, पण आग आटोक्यात न आल्यामुळे या गव्हाचे शेत संपूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे या शेतकऱ्याचे हजारो रुपयाचे नुकसान तर झालेच पण त्यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न देखील व खायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या शेतावरून गेलेल्या (एम एस.इ बी ) महावितरण च्या पोल वरील विद्युत तारा शाॅटसर्किटमुळे यापूर्वीदेखील नुकसान झालेले होते. पोल व तारा दुसरीकडे हलवणे संदर्भात एमएसईबी ला यापूर्वी तक्रार अर्ज दिला होता. परंतु वेळोवेळी पातोंडा (ता. अमळनेर) येथील महावितरण विभाग यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे. कोरोना महामारी च्या या काळात हे झालेले नुकसान पाहून गावकर्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तरी सदर शेतकऱ्यास महावितरण कंपनीने नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.