नशिबानं थट्टा कशी मांडली… पती- पत्नी ला एकाचवेळी मृत्यू ने गाठले

अमळनेर (प्रतिनिधी) एखादया ची लग्नाची ब्रम्हगाठ बांधल्यानंतर ती मृत्यूसोबतच सुटत असेल तर त्याला काय म्हणावे? पती- पत्नी आयुष्य भर सोबत राहिले.. प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना पाठबळ दिलं… मृत्यूने एकाच वेळी गाठले अन अंत्यसंस्कार एकाच दिवशी झाले. आयुष्यभर सोबत राहिले… शेवटचा श्वास ही सोबत घेतला. क्रूर काळाने निकम परिवारावर नशिबाने थट्टा मांडली आहे.
येथील लक्ष्मी टॉकीजमागे असलेल्या शिवशक्ती चौकातील रहिवाशी बस आगारातील कर्मचारी राजधर नथ्थू निकम (वय – 64) हे काही दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज पहाटे पाचला त्यांची प्राणज्योत मालावली. वडिलांची अंत्ययात्रा आटोपतच सर्वजण घरी आले अन तिथे होत्याचे नव्हते झाले. पती विरहाने विमलबाईना दुःख अनावर झाले. दुपारी दोनला त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पुन्हा निकम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
▶️ मुलींनी दिला सामाजिक संदेश
निकम दांपत्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकुलत्या एक मुलगा स्वप्नील सोबत सुरेखा किशोर सूर्यवंशी (वड़जी), ज्योति दीनानाथ जाधव (विरार), पदमा कैलास सुतार (पुणे), दुर्गा चूड़ामन मिस्त्री (सूराय), ललिता शरद सूर्यवंशी (पुणे) या पाचही मुलींनी सुरुवातीला सकाळी अकराला वडिलांच्या व नंतर सायंकाळी सहाला आईच्या पार्थिवाला त्यांनी अग्निडाग दिला. दुःख असूनही एक चांगला सामाजिक संदेश दिला आहे. एसटी आगाराचे वाहक बापु तुळशिराम चौधरी यांच्यासह अनिल जंगलु देवरे, किशोर सूर्यवंशी, दीनानाथ जाधव, कैलास सुतार, चूड़ामन मिस्त्री,शरद सूर्यवंशी यांनी या निकम दांपत्याच्या अंत्यसंस्काराची तयारी केली.निकम दांपत्य हे वडजी (ता.भड़गाव) येथील मूळ रहिवासी आहेत.