वावडे येथे शिक्षण परिषद संपन्न

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वावडे येथील जि. प. केंद्रशाळेत ह्या शैक्षणिक वर्षाची सहावी शिक्षण परिषद संपन्न झाली. या परिषदेला गट शिक्षण अधिकारी विश्वासराव पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी शिक्षण परिषदेत मार्गदर्शन करतांना आपल्या शाळांची गुणवत्ता व विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी आपण पालकांशी संवाद वाढवला पाहिजे,त्याचबरोबर इंग्रजी शाळांच्या स्पर्धेच्या युगात आपण देखील आपल्या प्राथमिक शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग प्राधान्याने सुरू केले पाहिजेत, त्यामुळे विद्यार्थी शहराकडे जाण्याचा वेग कमी होईल व आपल्या शाळेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलेल आणि त्यामुळे आपली विद्यार्थी संख्या नक्कीच वाढेल.नुकत्याच संपन्न झालेल्या पन्नासाव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षकांसाठी असलेल्या शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत शिक्षकांचासहभाग अत्यल्प होता, ह्यापुढे प्राथमिक व माध्यमिक अश्या दोन्ही गटातील शिक्षकांनी नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य तयार करावे जेणेकरून त्या साहित्याचा उपयोग दैनंदिन अध्ययन अध्यापनात करता येईल अशा सूचना ह्याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना केल्या. व्ही स्कूल अँपचा वापर विद्यार्थी, शिक्षक यांच्यासोबत पालकांनीही वाढवावा ,निपुण भारत अभियान अंतर्गत आपल्या शाळेची गुणवत्ता टक्केवारी वाढीसाठी प्रयत्न करावेत,सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळतो म्हणून स्नेहसंमेलन गरजेचे आहे,त्याचबरोबर इ.5 वी शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेला बसविण्यासाठी प्रयत्न करणे, इ. महत्वाचे विषयासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. वावडे केंद्राचे केंद्रप्रमुख छगन पंढरीनाथ पाटील यांनी देखील प्रशासकीय तसेच शैक्षणिक बाबींसंदर्भात मार्गदर्शन केले .यावेळी वावडे येथील श्री बी बी ठाकरे हायस्कूल चे शिक्षक निरंजन पेंढारे, रवींद्र देवरे व प्रल्हाद पाटील यांनी शिक्षण परिषदेत शालेय स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले.सतिश शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले.ह्याप्रसंगी शालेय क्रीडा स्पर्धेत ,विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षक बंधू भगिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली देसले यांनी केले. सदर शिक्षण परिषदेसाठी केंद्रातील मुख्याध्यापक बापू चव्हाण, योगराज पाटील, उर्मिला पाटील,मंगला चव्हाण ,संगीता पाटील,उपशिक्षक राकेश सोनवणे, धनराज सोनवणे,रत्नप्रभा साळुंखे,स्वाती कदम, पाकीजा पिंजारी, अनिता बिऱ्हाडे,वसंत ठाकरे आदी शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.