पत्रकार स्व.सूर्यभान पाटील यांच्या पाल्याच्या शिक्षणाची भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने घेतली जबाबदारी!

जळगाव (प्रतिनिधी) येथील पत्रकार सूर्यभान भास्कर पाटील (वय 34, मु. पो. पिंप्री बुद्रुक, ता. एरंडोल, जि. जळगाव, ह. मु. पिंप्राळा-जळगाव) यांचे काल 26 मार्च 2021 रोजी अकाली निधन झाले. या पार्श्वभूमीवर नेहमीच समाजाप्रती दातृत्व मानले जाणारे भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, जळगावने स्व.सूर्यभान यांच्या मुलाला उत्तम,परिपूर्ण संपूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारत आहे,असा निर्णय विश्वस्त श्री.अशोकभाऊ जैन यांनी जाहीर केला आहे .
स्व. सूर्यभान पाटील यांच्यामागे पत्नी, पाच वर्षांचा मुलगा,आई, रुग्णालयात झुंज देणारे वडील व मोठा भाऊ हा जरी रक्ताच्या नात्यातील परिवार असला, तरी आपणही एक परिवारच आहोत. याच भावनेतून भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून स्व. सूर्यभान यांच्या मुलाला उत्तम, परिपूर्ण संपूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. तसेच भविष्यात निश्चितपणे योग्य ती मदत करण्याचाही आमचा प्रयत्न राहील. परमपिता परमेश्वर स्व. सूर्यभान यांच्या परिवारातील सर्वांना दुःख पेलण्याची शक्ती देवो, अशी मी प्रार्थना करतो, अशीही भावना अशोकभाऊ जैन यांनी व्यक्त केली आहे .