आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकाना गणपती उत्सवापूर्वी थकीत मोबदला द्या;संघटनेची मागणी

पूर्वसूचना न देता काम बंद करण्याचा इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यासह सुमारे ७२ हजार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. गेली अनेक वर्षे ते आरोग्य सेवा घरोघरी पोहचविण्यासह दरमहा सुमारे ८६ प्रकारची अनेकविध कामे दररोज सततपणे करीत आहेत. त्यांना मार्च २०२२ पासून कामाचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना घर कसे चालवावे? असा यक्ष प्रश्न पडला असून त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. गणपती उत्सवापूर्वी मोबदला अदा न झाल्यास जिल्ह्यातील सुमारे दोन हजार सातशे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न कधी आपले काम बंद करतील.असा इशारा संघटनेने दिला आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक दरमहा ठराविक कामाचा ठराविक अत्यल्प मोबदला दिला जातो. त्यांना नियमित वेतन किंवा पगार मिळत नाही. काम केले तरच त्यांना मोबदला दिला जातो अन्यथा नाही. थकीत मोबदला का दिला जात नाही याबाबत संघटनेने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात पाठपुरावा केला असता निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. आशा स्वयंसेविकांना थकीत मोबदला देण्यासह मुख्यालयाच्या आशाताईंना आरोग्य वर्धिनीचे मार्च २०२०पासून थकीत मोबदला अदा करावा, कुष्ठरोग आणि क्षयरोग कामाच्या सर्व्हेक्षणाचा मागील मोबदला देण्यात यावा,कोरोना कामाचा थकीत मोबदला आणि वाढीव मानधनाची थकीत रक्कम तातडीने देऊन ती दरमहा लागू करावी तसेच जियो टॅगच्या फोटोची सक्ती बंद करावी. कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी अत्यंत महत्वपूर्ण काम केले आहे.त्यांच्या कामाचे जागतिक आरोग्य संघटनेने देखील कौतुक केले आहे.परंतु राज्य शासनाच्या “गरज सरो अन वैद्य मरो” या भुमिकेमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना वरील थकीत कामाच्या मोबदल्यासह अन्य थकीत मोबदला गणपती उत्सव पूर्वी अदा करण्यात यावा. अन्यथा जिल्ह्यातील सुमारे दोन हजार सातशे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न कधीही आपले काम बंद करू शकतात.
रामकृष्ण बी.पाटील
कार्याध्यक्ष, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना, जळगाव