…. अन त्या गणित शिक्षकाचे पाच अन नऊशी जुळलं घट्ट नातं

अमळनेर (प्रतिनिधी) “लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात” असं नेहमी म्हटलं जातं, मात्र काहींचं आकड्यांशी एवढं घट्ट नातं जुळून येतं की, आयुष्यभर ते नातं तुटत नाही. याच परिस्थितीशी मिळतं जुळतं कहाणी आहे, येथील साने गुरुजी नुतन माध्य विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक एस डी देशमुख यांची. त्यांचे पाच अन नऊशी एवढं घट्ट नातं जुळलं आहे की, ते त्या आकड्यांच्या चक्रव्यूहातच अडकलेले आहे. विशेष म्हणजे त्यांनी अध्यापन कार्यातही गणित शिक्षक म्हणूनच काम केलं.
श्री. देशमुख यांचा ९ ऑगस्ट चा जन्म आहे, विशेष म्हणजे उद्या त्यांचा ५९ वा वाढदिवस (५ अन ९) आहे. आयुष्यभर गणित शिक्षक असलेला शिक्षक दिन ही ५ सप्टेंबर ला येतो. (तेथे ही ५ अन ९) श्री. देशमुख यांच्या पत्नी, मुलगा व मुलगी व सून यांच्या वाढदिवसाची तसेच त्यांच्या आई – वडिलांची जन्मतिथी व पुण्यस्मरण तारीख ही ५ अन ९ या आकड्याभोवतीच गुरफटलेली आहे. ५ मे ला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस, १४ ऑक्टोबर ला त्यांच्या पत्नीचा वाढदिवस (५ अन ९ ची बेरीज १४), ४ ऑगस्टला त्यांचा मुलगा शिरीष चा वाढदिवस ( ९ मधून ५ वजा केले असता ४), १९ सप्टेंबर महिन्यात त्यांच्या मुलीचा वाढदिवस ( ९+५+५), ३ फेब्रुवारी ला त्यांच्या सुनेचा वाढदिवस (९ चे वर्गमूळ ३), २५ नोव्हेंबर ला त्यांच्या आईची पुण्यतिथी ( ५ चा वर्ग २५), त्यांच्या वडिलांची जन्मतिथी १६ जुलै ( ५ चा २५, २५ मधून ९ वजा केले असता १६ उरतात), त्यांच्या आईचा स्मृतिदिन २० जानेवारीचा ( ५ गुणीला ४) अन त्यांच्या वडिलांचा स्मृतिदिन १ मार्चचा ( ५ मधून ४ वजा) एवढेच नव्हे तर त्यांच्या मुलाने गाडी घेतली तर योगायोगाने त्या गाडीचा नंबर ५९०० असा मिळाला ( म्हणजे त्यात ही ५ अन ९) याच पार्श्वभूमीवर श्री देशमुख हे उद्या ५९ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करणार आहेत. उद्या क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण सर्वांना रहावी यासाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक समितीतर्फे एक वेळ भुकेला पोटी राहण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्या आवाहनाला साथ देत श्री देशमुख हे एक वेळ वाचलेल्या अन्न बचत झालेल्या पैशातून ते उद्या ५९ जणांना जेवण देणार आहे, हे विशेष!