ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्काविषयी जागृती व्हावी!-डॉ.योगेश सूर्यवंशी

धुळे (प्रतिनिधी) जागतिकीकरणाच्या युगात ग्राहकांची दैनंदिन व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी व त्यांच्या हक्काविषयी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत ग्राहक पंचायतीच्या नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. योगेश सूर्यवंशी यांनी केले.
शहरातील झेड. बी. पाटील महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष व सामाजिक शास्त्र मंडळातर्फे मंडळातर्फे डॉ.योगेश सूर्यवंशी यांचे ‘ग्राहकांची जनजागृती’ या विषयी जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.पवार अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी माजी उपप्राचार्य अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ.विद्या पाटील, उपप्राचार्य प्रा.व्ही.एस.पवार ,डॉ.डी.के. पाटील महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाच्या संयोजिका व उपप्राचार्य डॉ. वर्षा पाटील तसेच धुळे तालुका ग्राहक पंचायत कार्यकर्ते मा.बी.डी. पाटील उपस्थित होते. डॉ. योगेश सूर्यवंशी म्हणालेत,ग्राहकांमध्ये व्यावहारिक सजगता येण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो. जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक महत्त्वाचा घटक आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी-विक्रीचा केंद्रबिंदू आहे. पण बऱ्याचदा व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे फसवणूक झाल्यास ग्राहक तक्रार निवारण मंचच्या माध्यमातून भरपाई कशा प्रकारे मिळवता येते या विषयी माहिती असणे आवश्यक आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना तिचे मूल्य उत्पादनाचा दिनांक एक्सपायरी डेट बघितली पाहिजे.दुकानदारांकडून पावती घेतली पाहिजे.
फसवणूक झाली तरी ग्राहकांना राज्य व जिल्हास्तरीय ग्राहक मंच व ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. डॉ. योगेश सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. फसवणूक झाल्यावर कुठे व कशी तक्रार करावी याची माहिती त्यांनी दिली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य पी.एच. पवार म्हणाले की, ग्राहक हा सजत व जागृत झाला पाहिजे. कोणतीही वस्तू खरेदी करताना चौकस असावे यासाठी ग्राहकांची जनजागृती होणे ही काळाची गरज आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक शास्त्र मंडळाचे संयोजक डॉ.अमोल पाटील यांनी केले . सूत्रसंचालन प्रा. संगीता लोहालेकर व आभार प्रा. गायत्री रवंदळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. शशिकांत खलाणे , प्रा. विशाल बोरसे , प्रा. राहुल पाटील , प्रा. उदय पाटील , प्रा. वैशाली जवराळ , प्रा. नितीन पाटील ,प्रा. मनोज बच्छाव, प्रा.प्राची खंडेलवाल प्रा. गोविंद पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
