स्व. लतादीदींनी चोपडा मसाप तर्फे स्वरांजली

चोपडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेच्या वतीने भारतीय संगीतावर आपल्या गायिकिने ठसा उमटवणाऱ्या जागतिक कीर्तीच्या ज्येष्ठ गायिका, स्वरसाम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विविध भाषांमधील विविध प्रकारची हजारो गाण्यांना आपला स्वरसाज चढवून अजरामर गाणी भारतीय सिनेसृष्टीला देवून त्यांनी संगीत क्षेत्र समृध्द करणाऱ्या स्व. लता मंगेशकर यांच्या प्रती यावेळी उपस्थितांनी संवेनदना व्यक्त केल्या.
विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या निवासस्थानी दि. १३ रोजी झालेल्या कार्यक्रमात मनोज चित्रकथी, शिरीष गुजराथी, विवेक बाविस्कर यांनी स्व. लता मंगेशकर यांची गाजलेली व इतर सुश्राव्य भावगीते, भक्तीगीते, लोकगीते सादर केली तर प्रसिद्ध तबलावादक हरीश भावसार (पुणे), नरेंद्र भावे, विजय पालीवाल यांनी साथसंगत केली. कु. ईशा भावसार या चिमुकलीने आणि रिया भावसार यांनी तबलावादन केले. कवी अशोक सोनवणे यांनी श्रद्धांजली वाहतांना स्व. लता मंगेशकर यांच्या विषयी भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
प्रारंभी शाखेचे अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, उपाध्यक्ष प्राचार्य राजेंद्र महाजन व उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण केली. प्रास्ताविक कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी केले. यावेळी डाएट (जळगाव) च्या अधिव्याख्याता प्रा. प्रतिभा भावसार यांच्यासह शाखेचे सदस्य व श्रोते उपस्थित होते.