राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त धनदाई महाविद्यालयात ऑनलाइन प्रबोधन

अमळनेर (प्रतिनिधी) “एक व्यक्ती एक मत, एक मूल्य या तत्त्वावर आधारित भारतीय लोकशाहीत तरुणांनी मताधिकाराचा वापर जबाबदारी पूर्वक करावे. त्यामुळे भारतीय लोकशाही अधिक सशक्त व मजबूत होऊ शकते, असे सांगत महाविद्यालयीन तरुणांनी आपले मतदान ओळखपत्र बनवणे व मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य समजावे असे आवाहन ‘आयक्यूएसी’ कॉर्डिनेटर प्रा. लिलाधर पाटील यांनी केले. “लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदार साक्षरता” या विषयावर त्यानी प्रबोधनपर व्याख्यान दिले.
येथील धनदाई महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता विभाग आणि स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र यांच्यातर्फे राष्ट्रीय मतदार दिवस ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्याच्या उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य किशोर पाटील हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. शिक्षण सहसंचालक डॉ. चव्हाण यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्त्व स्पष्ट करून हा उपक्रम तरुणांसाठी असल्याचे सांगितले. प्रा. किशोर पाटील यांनी मतदार दिवसाचा थोडक्यात इतिहास मांडला. स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा. महादेव तोंडे यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे महाविद्यालयाच्या फेसबुक पेजवर लाइव्ह प्रक्षेपण देखील करण्यात आले.