भाकरी,छोकरी,नोकरी यापलीकडील विचाराने चांगली माणसे घडतात! -यजुर्वेंद्र महाजन

चोपडा (प्रतिनिधी) जग गुणवत्तेचे आहे, सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी, कारणे न सांगणे यासारख्या गोष्टी अंगी बाणवल्याने चांगले माणूस बनता येते. भाकरी, छोकरी आणि नोकरीच्या पलीकडे जाऊन विचार केल्याने चांगली माणसे घडतात. आपल्या कामाने आपली, आपल्या कुटुंबाची, समाजाची ओळख व्हावी. प्रत्येक कामात प्रामाणिक राहणे, संवेदनशील असणे, कर्तव्यदक्ष असणे ही चांगले माणूस बनण्याची त्रिसूत्री आहे. माणसे मोठी असून उपयोग नसतो; माणसे चांगली असावी लागतात. भगिनी मंडळातर्फे दिला जाणारा ‘सुशील शिक्षक पुरस्कार’ चांगुलपणाचा पुरस्कार आहे, असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशन व मनोबलचे संस्थापक, प्रेरणादायी युवा व्याख्याते यजुर्वेंद्र महाजन यांनी केले.
चोपडा येथील भगिनी मंडळ संस्थेतर्फे संस्थेच्या माजी अध्यक्षा स्व. डॉ सुशीलाबेन शाह यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या ‘सुशील शिक्षक पुरस्कार – २०२१’ वितरण प्रसंगी ते ‘चांगली माणसे घडविण्यासाठी’ या विषयावर बोलत होते. यंदाचा सुशील शिक्षक पुरस्कार संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षक संजय रघुनाथ बारी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गौरवपत्र, शाल, पुष्पगुच्छ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. समाजकार्य महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाई गुजराथी (माजी विधानसभा अध्यक्ष), जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार, माजी शिक्षक आमदार प्रा. दिलीप सोनवणे, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, स्वच्छतादूत डॉ. विकास हरताळकर, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, सहायक पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, गटनेते जीवन चौधरी, माजी जि. प. अध्यक्ष गोरख पाटील, मार्केट कमिटीचे माजी सभापती जगन्नाथ पाटील, व्यावसायिक नेमीचंद जैन, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, उपाध्यक्षा छाया गुजराथी यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आपल्या बिजभाषणात यजुर्वेंद्र महाजन म्हणाले, साधे आणि चांगले राहणे ही खूप मोठी गोष्ट आहे. दोन जण बोलत असताना तिसऱ्या विषयी कधीही बोलू नये. जर बोलावे लागलेच तर चांगलेच बोलावे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये ग्रामीण पार्श्वभूमी असल्याचा न्यूनगंड असणे, पालकांच्या व्यवसायाबद्दल सन्मान नसणे, मातृभाषेचा आदर नसणे यामुळेच आपणच आपले ब्रॅण्डिंग खराब करतो. आळस आणि न्यूनगंड आपल्याला प्रगतीपासून मागे खेचतो. आज समाजात दिव्यांग आणि अनाथ मुला मुलींना सर्वात जास्त मदतीची गरज आहे. त्यांच्यासाठी यशस्वी होण्यासाठीच्या संधी उपलब्ध करून देणे हे मानवतेचे कर्तव्य आहे. मनोबल आणि दीपस्तंभ मार्फत सुरु असणाऱ्या कार्याचा परिचय करून दिला.
याप्रसंगी बोलतांना क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. बी. व्ही. पवार म्हणाले, इंटरनेट माहिती पुरवते तर ज्ञान मात्र शिक्षकांकडून मिळते. संस्थेतर्फे गुणवंत शिक्षकांचा होणार सन्मान हा शिक्षकाचे शिक्षण प्रक्रियेतील महत्व अधोरेखित करणारा आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आदर्श मूल्ये जपत ही संस्था वाटचाल करत आहे, ही बाब समाजासाठी प्रेरणादायी आहे. समाज आणि देश घडविणारी शिक्षक पिढी निर्माण व्हावी यासाठी समाजाने माध्यमे आणि उदाहरणे तयार करावी. संस्थेतर्फे सुरु करण्यात आलेल्या पोलिस प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रासाठी पोलिस दलातर्फे शक्य ती सर्व मदत केली जाईल. ग्रामीण भागातील विद्यार्थी श्रम करण्यात कधीही मागे नसल्याने यशस्वी होण्याची संधी जास्त असल्याचे सांगत सुशील शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अरुणभाई गुजराथी यांनी वेदनेला वेद बनवा, शोकला श्लोक बनवा, पुरुषार्थला माणूस बनवा. जीवनात माणूसपण महत्त्वाचे. हृदयाची संपन्नता, मानवता, ऋजुता वाढवणारे शिक्षण आवश्यक आहे. माणूस जीआर, सीआर यांना जितका घाबरत नाही तितका एफआयआरला घाबरतो. प्रामाणिक माणसाला न्याय मिळत नाही ही माणसाची व्यथा आहे. प्रत्येकाच्या हृदयात न्यायालय असावे. त्यामुळे स्वतः स्वतःला फसवू शकत नाही. गरीबी हा देशातील सर्वात मोठा रोग आहे असे सांगत राजकारणातले शब्द हिंसक झाले असल्याची व्यथा व्यक्त केली. संस्थेतर्फे दिला जाणारा सुशील पुरस्कार हा स्व. डॉ. सुशीलाबेन शाह यांच्या कार्याची सतत आठवण आणि प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी भगिनी मंडळाच्या पोलिस भरती प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राचे, वसंतम् ऑक्सिजन झोन, प्राणायाम व योग वाटीकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. दातृत्व भावनेने कार्य करणारे चोपडा शहरातील जिनिंग व्यावसायिक सुनील जैन, सुनील अग्रवाल, संतोष हरसाय अग्रवाल, अशोक अग्रवाल, विश्वनाथ अग्रवाल, विक्की अग्रवाल यांचा देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सुशील शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संजय बारी यांनी व जीनिंग व्यावसायिक संतोष हरसाय अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. ‘सुशील शिक्षक’ पुरस्काराची घोषणा व प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी यांनी, सूत्रसंचालन डॉ. विनोद रायपुरे व आभारप्रदर्शन जितेंद्र जोशी यांनी केले.
या कार्यक्रमास वसंतलाल गुजराथी, आशिष गुजराथी, गिरीश पाटील, कवी अशोक सोनवणे, निवृत्त मुख्याध्यापक सुधाकर केंगे, रोटरी क्लब अध्यक्ष पंकज बोरोले, संस्थेचे समन्वयक प्रा. आशिष गुजराथी यांच्यासह संस्थेतील विविध शाखांचे विभागप्रमुख, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाचा ‘सुशील शिक्षक पुरस्कार – २०२१’ संस्थेच्या महीलामंडळ माध्यमिक विद्यालयातील शिक्षक संजय रघुनाथ बारी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गौरवपत्र, शाल, पुष्पगुच्छ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. संजय बारी हे विद्यालयात २६ वर्षांपासून अध्यापन करत असून विविध प्रशिक्षणामध्ये राज्यस्तरावर तज्ञ मार्गदर्शक तसेच विद्यार्थी व शिक्षक हस्तपस्तिका निर्मिती, परिसंवाद, परिषदा यामध्ये सहभागी होत असतात, विविध शैक्षणिक विषयांवर लेखन करतात. ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे प्रमुख कार्यवाह देखील आहेत.
