विधान परिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर!

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान, तर 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
विधान परिषदेच्या एकूण 8 जागांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. मात्र, सोलापूर आणि अहमदनगर वगळून 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार,अकोला-बुलडाणा- वाशिम व नागपूर, अशा 6 जागांसाठी ही निवडणूक होत आहे..
मुंबईत रामदास कदम व भाई जगताप, कोल्हापुरात सतेज पाटील, धुळ्यात अमरिशभाई पटेल, अकोल्यात गोपीकिशन बजोरिया, तर नागपूरमध्ये गिरिश व्यास यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
▶️ नगर, सोलापूर वगळले
नगर जिल्ह्यातील 5 पालिका व भिंगार छावणी परिषदेवर सध्या प्रशासक आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या 75 टक्के होत नाही. सोलापूरमध्येही अशीच स्थिती असल्याने या दोन्ही मतदार संघातील निवडणूक स्थगित ठेवण्यात आली आहे.
सध्या राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. आता या निवडणुकीत हे सगळे पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे, याबाबत उत्सुकता ताणली आहे. काँग्रेसने यापूर्वी अनेकदा स्वबळाचा नारा दिलाय. शिवसेना व राष्ट्रवादीही आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे.
▶️ असा आहे निवडणूक कार्यक्रम
▪️ अधिसूचना जाहीर : 16 नोव्हेंबर
▪️ अर्ज दाखल करण्याचा दिनाक : 23 नोव्हेंबर
▪️ अर्जांची छाननी : 24 नोव्हेंबर
▪️ अर्ज मागे घेण्याची मुदत : 26 नोव्हेंबर
▪️ मतदान : 10 डिसेंबर (सकाळी 8 ते 4)
▪️ मतमोजणी : 14 डिसेंबर