एरंडोल विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीकपेरा व फेर पंचनामा करून SDRF च्या नियमा प्रमाणे मदत द्या! – आ.चिमणराव पाटील

पारोळा (प्रतिनिधी) शासन निर्णय क्रमांक सीएलएस-२०२१/प्र.क्र.२५८/म-३, मंत्रालय, मुंबई -४०००३२ दि.२१ ऑक्टोबर २०२१ अन्वये जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत दि.१३/१०/२०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मदत प्रदान करण्यात आली. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रती हेक्टरी १०,०००/- रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रती हेक्टरी १५,०००/- रुपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रती हेक्टरी २५,०००/- रुपये मदत देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे.त्याअनुषंगाने एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पारोळा, एरंडोल व भडगांव तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांना देखील जिरायत पिकांच्या नुकसानी यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. तसेच बागायतदार शेतकरी यांच्या उताऱ्यांवर विहीर लावण्यात आलेली असून बागायती पिकांचे कर्ज देखील तालुक्यांतील शेतकऱ्यांनी घेतलेले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांचे पंचनामे सुद्धा केलेले नसून कुठलीही मदत संबंधित शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सदरील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून बागायतदार शेतकऱ्यांना जिरायत पिकांचा लाभ न देता त्यांना बागायत पिकांच्या नुकसानी यादीत समाविष्ट करून मदत देण्यात यावी व फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे तातडीने फेर पंचनामे करून त्यांना बहुवार्षिक पिकांच्या नुकसानी यादीत समाविष्ट करून त्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे केली आहे.
