विभागीय आयुक्त गमेंनी केली दहीवद येथील विविध विकास कामांची पाहणी!

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहीवद ग्रामपंचायतीस आज विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट देऊन तेथील विविध विकास कामांची पाहणी केली. या भेटीदरम्यान आयुक्त गमे यांनी माझी वसुधंरा अभियानातंर्गत झालेल्या वृक्षरोपण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या कामांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामस्थांनी या अभियानामध्ये अधिकाधिक सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
त्याचबरोबर गावात रोजगार हमी योजनेतंर्गत सुरु असलेले वृक्षरोपण, घरकुल योजना, शोषखड्डे आदि कामे लवकर लवकर पूर्ण करण्याची सुचना केली. महसूल विभागामार्फत मोफत सातबारा व खाते उताऱ्याचे वाटप केले. शेतकऱ्यांना सातबारा व खातेउतारा घरपोच देण्याबाबत तहसिलदार व तलाठी यांना सुचना दिल्या. यावेळी आयुक्त श्री. गमे यांनी रोजगार हमी योजनेतंर्गत काम करणाऱ्या मजूरांशी संवाद साधून नवीन मजूर नोंदणीबाबतचाही आढावा घेतला. ग्रामस्थांकडून गावांत सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती जाणून घेतली तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी त्यांचेसमवेत विभागीय आयुक्त कार्यालयातील श्रीमती नाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) श्री. दिगंबर लोखंडे, अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती सीमा अहिरे, यांच्यासह तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, सरपंच श्रीमती सुषमा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.