कविता काळजातल्या, काव्यमैफिल रंगली,अमळनेरात!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील जी.एस.हायस्कूल च्या आय.एम.ए. हॉल मध्ये निमंत्रित कवींची ‘कविता काळजातल्या’ ही काव्यमैफिल काव्यरसिकांच्या भरगच्च उपस्थितीत रंगली.
निमंत्रित कवींमध्ये प्रसिद्ध लोककवी,सिनेगीतकर प्रा.प्रशांत मोरे, धुळ्याचे कवी प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी,करणखेड्याचे कवी शरद धनगर, लोंढव्याचे कवी डॉ.कुणाल पवार यांनी आपल्या मराठी, अहिराणी कविता व गझलांनी उपस्थितांचे मने जिंकली. मैफिलीचे उद्घाटन अमळनेरचे पोलीस निरीक्षक माननीय जयपाल हिरे यांच्या हस्ते झाले.
‘तुझा हात परीस
माझा लोखंडी ग झुला..
हात परीस लागला.
झुला सोन्याचा झाला..’
कवी प्रशांत मोरेंच्या या ‘माय’ कवितेतील ओळींनी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. तसेच “गहू दयस बाजरी दयस..” ह्या अहिराणी गाण्याने उपस्थितांची मने जिंकली.
प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी यांच्या
‘जग दुन्यानी नजर म्हान मी येडाम्हाना शे भाऊ
अहिराणी मन्ही भाषा आनी नी खेडाम्हना शे भाऊ’
या ओळीतुन ग्रामीण चित्रण स्पष्ट झाले.
कवी डॉ.कुणाल पवार यांनी कवितांसोबत गझल ही सादर केली. तिचे बोल असे होते.
‘तिला पाहिल्यावर सुचावी गझल
दुराव्यात सोबत असावी गझल
हृदय धडधडावे सखीचे तिथे
अशी काळजातून यावी गझल’
तसेच
“माय मनी तू खटला म्हानी
तून्ह कष्ट कधी नई सरस वं
तून्हाज पोटे माले सात जलम दे
हाई नसीब मन्ह म्हणसं वं”
या अहिराणी कवितेने उपस्थित स्तब्ध झाले.
तसेच शरद धनगर यांनी
“तुझ्याशी जरी जन्मभर वाद केले
सखे मी मनोमन तुला याद केले”
ह्या गझल सोबतच अहिराणी कविता
माय मुक्ताईना राग माय तुकोबाना त्याग
माय दयतांना व्हस ओवी अभंग ना भाग”
ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली..
कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीम. सुनीता पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. शरद पाटील यांनी केले. आभार श्री. दत्तात्रय सोनवणे यांनी मानले. या कार्यक्रमाला श्री.वाल्मीक मराठे पाटील व श्री. विपीन वसंत पाटील यांनी विशेष सहकार्य केले. तसेच खान्देश साहित्य संघ, अमळनेरच्या सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनमोल सहकार्य केले.
