अखेर बिगुल वाजला; जि.प. व पंचायत समिती पोटनिवडणुक 5 ऑक्टोबरला!

मुंबई (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगाने अखेर धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा, तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला. त्यानुसार, ५ ऑक्टोबर रोजी मतदान, तर ६ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.
वरील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील रिक्त पदांसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाचा ६ जुलै २०२१ रोजीचा आदेश व राज्य सरकारने कोविडमुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याची केलेली विनंती, यामुळे या निवडणुका ९ जुलै रोजी स्थगित केल्या होत्या.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे 11 ऑगस्ट 2021 रोजीचे कोविड संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू नसल्याचा निर्णय दिला. न्यायालयाचा आदेश व कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
▶️ पालघरचीही निवडणूक सोबत
पालघर जिल्हा परिषद व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा समावेश पूर्वी वरील निवडणुकीसोबत केलेला नव्हता. कोविडमुळे तेथील पोटनिवडणुका जाहीर केलेल्या नव्हत्या. मात्र,आता या सर्व निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
पालघर जिल्हा परिषद व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी १५ ते २० सप्टेंबर दरम्यान नामनिर्देशनपत्रे दाखल होतील, २१ सप्टेंबरला त्याची छाननी होईल. पुढील टप्पे ५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसोबत होणार असल्याचे निवडणून आयुक्तांनी सांगितले.