राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडणार!-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कल्याण (वृत्तसंस्था) राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी विरोधी पक्षांकडून सातत्याने आंदोलने सुरू असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच या प्रश्नांवर भाष्य केले. राज्यातील मंदिरे सरकार टप्प्याटप्प्याने उघडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, की “हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्यावश्यक आरोग्य मंदिरे आपण उघडत आहोत. धार्मिक स्थळे उघडलीच पाहिजेत; पण आज खरी गरज आरोग्य मंदिरांची आहे. आरोग्य केंद्र बंद करून त्याच्या बाजूचे मंदिर उघडू का?”
“आपण ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देतो; पण त्या भारतमातेची मुले आरोग्यासाठी तळमळत असताना, भारत माताही म्हणेल की, अरे माझा जयघोष कसला करता, माझ्या बाळांकडे जरा पाहा. त्यांना औषधं द्या. केवळ घोषणा दिल्याने ती बरी होणार नाहीत,” असे ठाकरे म्हणाले.
▶️ राजकीय पक्षांनी संयमाने वागावे
कोरोनाचे संकट दाराशी असताना, राजकीय पक्षांनी थोडं संयमाने वागायला हवे. आपले राजकारण चालत राहील; पण आपणच जबाबदारीने वागलो नाही, तर जनता आपल्याकडून काय अपेक्षा ठेवेल? त्यामुळे राजकीय पक्षांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.