केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक; मुख्यमंत्र्याबाबतचे वक्तव्य भोवले!

चिपळूण (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. दरम्यान, राणे यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना बीपी व शुगरचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यभर भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा सुरु झाला आहे. दरम्यान, भाजपने मात्र राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन करीत नसल्याचे सांगताना, त्यांच्या पाठिशी मात्र ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितलेय.
शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांत राणे यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. नाशिकच्या पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक चिपळूणला गेले होते.
▶️ अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला
दरम्यान, ही अटक टाळण्यासाठी राणे यांनी रत्नागिरी न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, मुंबई हायकाेर्टाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.
अखेर रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना ताब्यात घेतले. सरकारी डॉक्टरांकडून वैद्यकीय चाचणी करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
▶️ राणे असे म्हणाले होते.
राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर वक्तव्य करताना असे म्हटले होते, की “किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?”