सर फाऊंडेशन तर्फे बक्षीस वितरण व जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न!

0

जळगाव (प्रतिनिधी) सर फाऊंडेशन जळगांव आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर समुह नृत्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा व जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार वितरण सोहळा किड्स गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव येथे नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण विभाग, डॉ. डी. एम. देवांग यांनी भूषविले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी, जळगांव विजय पवार, सर फाऊंडेशन सोलापूर जिल्हा समन्वयक राजकिरण चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रमाचे प्रायोजकत्व प्रविण आत्माराम पाटील, पाचोरा (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जळगांव) यांनी केले. प्रविण पाटील सर्व विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रे स्वखर्चाने उपलब्ध करून दिली.
सर्वप्रथम ईशस्तवन व स्वागतगीत सौ. काळवीट मॅडम यांनी सादर केले. त्यानंतर अध्यक्ष निवड करण्यात आली. अध्यक्ष व प्रमुख अतिथी तसेच जिल्हा समन्वयक यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व नटराज पूजन करण्यात आले.
त्यानंतर अध्यक्ष व सर्व मान्यवरांचा पुस्तक व बुके देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता पाटील, महिला जिल्हा समन्वयक जळगाव यांनी केले. त्यानंतर जिल्हा समन्वयक आदरणीय निलेश शेळके यांनी सर फाऊंडेशन च्या कार्याची माहिती सर्वांना दिली.
नंतर प्रथम क्रमांक प्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांची सुंदर नृत्ये सादर झाली. शिक्षक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त शिक्षकांनी देखील बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. सर्व स्पर्धक व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार प्रमाणपत्र, गुच्छ व ट्रॉफी देऊन करण्यात आला.
त्यानंतर नारीशक्ती पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 8 मार्च 2021 या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आठ भगिनींना जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान 2021 या पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष महत्वाची बाब म्हणजे स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकाला देखील सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमासाठी सुंदर रांगोळी रेखाटणाऱ्या व नृत्यात सहभाग नोंदविणाऱ्या सुवर्णा महाजन यांनी विजेत्यांमधून प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर मान्यवरांची मनोगते झाली. मनोगत व्यक्त करतांना राजकिरण चव्हाण (जिल्हा समन्वयक सोलापूर) यांनी कार्यक्रमाच्या आयोजन , नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच सर फाऊंडेशनच्या भारतभरातील विस्ताराची, शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याची यशोगाथा सांगताना जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांकडूनही भरीव कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रायोजक प्रविण आत्माराम पाटील यांनी कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यातही सर फाऊंडेशनच्या प्रत्येक विधायक कार्यात शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
उपशिक्षणाधिकारी विजय पवार साहेब यांनी फाऊंडेशन करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली व भविष्यात कोणतीही मदत लागल्यास ती नक्की करू असे आश्वासन दिले. शिक्षकांनी आपले काम निष्ठेने केल्यास त्यांना नक्कीच शाबासकीची थाप मिळते असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. देवांग साहेब यांनी सर्व यशस्वी स्पर्धकांचे, सुंदर नृत्य करणाऱ्या शिक्षिका भगिनींचे कौतुक केले.डॉ. देवांग निवृत्तीनंतरही सर फाऊंडेशनच्या कार्याला पूर्णवेळ देणार असल्याचे सांगितले. नारीशक्ती पुरस्कार मिळालेल्या सर्व आठही भगिनींचे अभिनंदन केले.
यानंतर अरुणा उदावंत (जिल्हा समन्वयक जळगाव) यांनी कार्यक्रमाला सहाय्य करणाऱ्या प्रत्येक घटकाचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील व जयश्री काळवीट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीपणे पार करण्यासाठी तालुका समन्वयकांनी परिश्रम घेतले.
चविष्ट अल्पोपहारानंतर राजकिरण चव्हाण (सोलापूर जिल्हा समन्वयक) यांनी सर्व तालुका समन्वयक यांच्याशी संवाद साधून पुढील ध्येय धोरणे निश्चित केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!