अनुसूचित जातीतील पीडितांना नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई द्या; विविध संघटनांची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या दोन वर्षांपासून देशासह महाराष्ट्र व त्यातच अमळनेर तालुक्याला अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले. व प्रशासनाने ते मोठ्या धैर्याने स्वीकारले देखील हे मान्य करावेच लागेल. अतिवृष्टी असो वा दुसरे काही संकट या मध्ये काही लोकांनी आपला जीवही गमावला आहे. अनेक घरांचे कर्ते लोक मृत्यूमुखी पडले. व अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अश्या लोकांच्या वारसांना आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे नुकसान भरपाई मिळत असते. तालुक्यातील निसर्गाने घाव घातलेल्या अनेक लोकांना ही नुकसान भरपाई रक्कम मिळाली मात्र काही अनुसूचीत जातीतील पीडितांनाच ही नुकसान भरपाई शासनाच्या वतीने मिळालेली नाही असे निदर्शनास आले आहे. असे म्हणत हे जर खरे असेल तर ही महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यात खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. जे काही असे प्रकरण प्रलंबित असतील त्यांना लवकरात – लवकर मार्गी लावण्यात यावे व संबंधित पीडितांना लवकरात लवकर मदत घ्यावी. अशी मागणी अमळनेर तालुक्यातील विविध संघटनांनी एकत्र येत आज केली. तहसिलदार अमळनेर यांना या बाबत निवेदन देण्यात आले आहे. यात समता समिती, भिम आर्मी व बहुजन रयत परिषद या संघटनांचा सहभाग होता. यावेळी निवेदनावर समता समितीचे अध्यक्ष समाधान मैराळे, सचिव सुरेश कांबळे, लोकसंघर्ष मोर्चाचे खांदेश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे, भिम आर्मीचे तालुका अध्यक्ष प्रवीण बैसाणे, शहर अध्यक्ष कृष्णकांत शिरसाठ, बाळासाहेब सोनवणे, राजू कांबळे, अविनाश पवार, उमाकांत बेहेरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.