आदिवासी कुटुंबाला दिला,शिवशाही फाऊंडेशनने मदतीचा हात!

▶️ वडिलांच्या जयंतीचे औचित्य साधत काटे बंधूंचे दातृत्व
अमळनेर (प्रतिनिधी) “समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलवा … अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे” या साने गुरुजींच्या या काव्यपंक्तीचा प्रत्यय काटे बंधूच्या समाजशील कृतीतून बघायला मिळाला. आपल्या वडिलांच्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी कुटूंबातील सर्व सदस्यांना नवे कपडे, साडी व किराणा माल देऊन माणुसकीचा हात दिला. शिवशाही फाऊंडेशन च्या माध्यमातून काटे बंधूनी सामाजिक भावना जोपासत वडीलांची जयंती अनोख्या पद्धतींने साजरी करून कृतीयुक्त अभिवादन केले.

करणखेडे (ता.अमळनेर) येथील रतीलाल बाबू भिल्ल यांची झोपडी शुक्रवारी (ता.1) मध्यरात्री जळून खाक झाली. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी त्या आदिवासी कुटुंबाचे होतं नव्हतं सारं आगीत जळून नष्ट झाले. मजुरीचे आलेले 10 ते 15 हजार रुपयासह आवश्यक कागदपत्रे जळाली आहेत. केवळ अंगावरचे कपडे शिल्लक आहेत. त्यांचे मूळ गाव विरवाडे (ता. चोपडा) येथील असले तरी गेल्या 7 वर्षांपासून करणखेडे येथे वास्तव्यास आहे. मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह भागवत होते. संसारोपयोगी सर्व वस्तू जळाल्याने शिवशाही फाऊंडेशन च्या माध्यमातून काटे बंधूनी आपले वडील स्वर्गीय पी. आर. काटे यांच्या 71 व्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी कुटूंबातील सर्व सदस्यांना मदत स्वरूपात कपडे, साडी व किराणा माल देऊन माणुसकीचा हात दिला. शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रजाराज्य न्युजचे मुख्य संपादक जयेशकुमार काटे, सकाळ वृत्तपत्राचे अमळनेर तालुका बातमीदार उमेश काटे यांनी सामाजिक भावना जोपासत वडीलांची जयंतीदिनी अनोख्या पद्धतींने कृतीयुक्त अभिवादन केले. यावेळी कुटूंबातील सदस्य रतीलाल भिल, सुनंदाबाई भिल, भाऊलाल व विकास या मुलांकडून घटनेचे इतिवृत्त ऐकून घेत कुटूंबाला आधार देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवले.तसेच भविष्यातही मदत देण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपक्रमशील शिक्षक विशाल देशमुख, करणखेड्याचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसेच राणी बँडचे सर्वेसर्वा गणेश गुरव, कवी शरद धनगर, दक्षता काटे, वेदांत पाटील, चंद्रकांत पाटील, अनमोल पवार,रवींद्र गुरव, बारकू पारधी तसेच गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.

▶️ देणाऱ्याने देत जावे…
“देणाऱ्याने देत जावे… घेणाऱ्याने घेत जावे… घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे” या काव्यपंक्ती च्या पार्श्वभूमीवर गावातील व परिसरातील अनेक दातृत्व व्यक्तींनी या आदिवासी कुटुंबाला वस्तू स्वरूपात तसेच आर्थिक स्वरूपात मदत दिली आहे. सुरुवातीला गावाचे माजी उपसरपंच गणेश गुरव यांनी पाच हजार रुपयांची मदत केली. त्यानंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही एक महिन्याचा किराणा दिला. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या सूचनेनुसार रेशन दुकानदाराने 20 किलो तांदूळ, 30 किलो गहू दिला. तरी दानशूर व्यक्तींनी या कुटुंबाला धान्य, किराणा, आवश्यक भांडी, कपडे स्वरूपात मदत करून मानसिक आधार द्यावा. आर्थिक स्वरूपात मदत करायची असल्यास 9423579827 किंवा 9923428769 या फोन पे वर पैसे पाठवावेत असे आवाहन शिवशाही फाउंडेशन तर्फे करण्यात येत आहे.
