आयकर कायद्यातील महत्वाचे बदल लक्षात घ्यावे: श्रीकांत रहाळकर

0

“ऑनलाईन वेबिनार 2021” च्या राज्यव्यापी कार्यशाळेत मार्गदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) पूर्वी धर्मदाय आयुक्त यांनी ट्रस्ट म्हणून दिलेली मान्यता कायमस्वरूपी असायची, मात्र नवीन कायद्यानुसार ही मुदत आता पाच वर्ष करण्यात आली आहे. पाच वर्ष संपण्यापूर्वी पुन्हा त्याचे नूतनीकरण करून घ्यावे असे आवाहन ज्येष्ठ व प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट श्रीकांत रा. रहाळकर (नाशिक) यांनी केले. “सार्वजनिक ट्रस्ट पुनर्नोंदणी व आयकर कायद्यातील महत्वाचे बदल” या विषयावर ते बोलत होते.
श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती (नवी दिल्ली), दयारामजी प्रतिष्ठान (नाशिक), महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ (पुणे) व ऑडिटर कौन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वेबिनार 2021 चे राज्यव्यापी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री तथा राज्य शिक्षण संस्थांचे अध्यक्ष नानासो. विजय नवल पाटील हे होते. श्रीकांत रहाळकर यांनी सांगितले की,धर्मदाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या न्यास, धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था व कंपनी यांच्या साठी 12 एए प्रमाणे आता आयकर आयुक्तांकडे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. हे नूतनीकरण 1 एप्रिल ते 30 जून दरम्यान करावयाचे आहे. त्यानंतर आयकर आयुक्त नूतनीकरण प्रमाणपत्र देतील. आपण नूतनीकरणाचे प्रस्ताव टाकल्यानंतर तीन महिन्यानंतर हे प्रमाणपत्र मिळते, पण हे नूतनीकरण पाच वर्षांच्या काळासाठी मान्य असते. ज्यांनी 10 ए प्रमाणे पूर्वी ज्यांनी 12 ए 12 एए म्हणून मान्यता घेतलेली असेल, त्यानीही आयकर आयुक्तांकडे परवानगी घेऊन नूतनीकरण करण्याचे आवश्यक आहे. धर्मदाय संस्था, ट्रस्ट, न्यास, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांना देणगी देण्यासंदर्भात जाचक अटी लावण्यात आल्या आहेत. शैक्षणिक संस्थांना काही मर्यादेपर्यंत भांडवली सूटही देण्यात आलेली आहे. कोरोना काळात सामाजिक व्यासांनी आपापल्या परीने मदत केली आहे. अशा या संस्थांना प्रोत्साहन व समर्थन देण्याची आवश्यकता आहे, कारण अनेक शैक्षणिक संस्था या दानशूर व्यक्तींच्या देणगीच्या मदती वरच अवलंबून असतात. प्रत्येक मोठया कंपनीला आपल्या नफ्याच्या दोन टक्के खर्च हा सामाजिक बांधिलकी म्हणून खर्च करावा लागतो. ज्या नोंदणी केलेल्या संस्थांना सी एस आर फंड मधून निधी घ्यावयाचा आहे, असेल अशांनी शासनाकडे नोंदणीकरण करणे गरजेचे आहे. यामुळे शासनाला योग्य ती माहिती होते पर्यायाने गैरप्रकारही होत नाही. दरम्यान माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आयकर कायद्यातील बदलाबाबत घेतलेली ही राज्यव्यापी कार्यशाळा कौतुकास्पद आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांसह इतर संस्थांना नवीन आयकर कायद्यातील महत्व व बदल लक्षात येतील. राज्यातील सर्व शिक्षण संस्थाचालकांनी ज्या शिक्षण संस्था धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारीत येतात, अशा शिक्षण संस्था चालकांनी नवीन आयकर कायद्यानुसार नूतनीकरण चे प्रस्ताव सादर करण्याचेही आवाहन केले. सीए श्रद्धा गावंडे (नाशिक) व ऑडिटर संदीप नगरकर (नाशिक) यांनी या ऑनलाईन राज्यव्यापी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला सुप्रसिद्ध उद्योजक संजय गावंडे, बाळासाहेब पाटील, विजय कौशल, वसंतराव खेडकर, वाल्मीक सुरासे, गणपतराव बालवडकर, मुरलीधर पाटील, मिलिंद पाटील, एस पी जवळकर,प्रा. सुनील गरुड, प्रभाकर कोळी, सचिन बोरसे, विनोद पाटील, एस एन महाले, उमेश काटे आदीसह शैक्षणिक संस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!