डोंगर कठोरा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून हिवताप मोहिमेबाबत जनजागृती

यावल (प्रतिनिधी) सुनिल गावडे,
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून हिवताप प्रतिरोध मोहिमेबाबत जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
जागतिक कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी लढा देत असतांना पावसाळा सुरू होत आहे.पावसाळ्यात नागरिकांना किटकजन्य व जलजन्य आजार उद्भवतात याकरिता हिवताप विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी आरोग्य विभागामार्फत जून महिना हिवताप प्रतिरोध महिना साजरा केला जातो. या उपक्रमाद्वारे जनतेपर्यंत माहिती पोचविण्याचा प्रयत्न करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, भालोद प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हर्षल चौधरी,आरोग्यसेवक चेतन कुरकुरे, आरोग्य सहायक नितीन जगताप, तसेच आरोग्यसेविका लता चौधरी यांनी डोंगर कठोरा,बोरखेडा खुर्द व डोंगरदेपाडा गावात कंटेनर सर्वेक्षण,डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे, ग्रामपंचायत क्षेत्रातील गटारी वाहत्या करणे,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे,माहितीपत्रक वाटणे तापाचे रुग्णाचे रक्त नमुने घेऊन औषध उपचार देणे,गट सहभागी होऊन नागरिकांना आरोग्य शिक्षण घेणे अशा प्रकारे हिवताप डेंग्यू व चिकनगुनिया या आजारांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून व जनजागृती करून हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत आहे.यावेळी सरपंच नवाज तडवी उपस्थित होते.