पहिल्या’महिला सरसेनापतीं’चा इतिहास पडद्यावर येणार!

मुंबई (वृत्तसंस्था) छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या मराठा साम्राज्याच्या सीमा गुजरातपर्यंत विस्तारण्याचे काम सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी केले.त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी उमाबाई दाभाडे यांनी हे साम्राज्य राखले. इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये दडलेला हा इतिहास लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे.
मराठा साम्राज्यातील पहिल्या ‘महिला सरसेनापती’ उमाबाईसाहेब दाभाडे यांच्या जीवनावर भाष्य करणारा ‘भद्रकाली’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक याने या चित्रपटाची घोषणा केली.
प्रसाद ओक यांनी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करताना एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी इतिहासांच्या पानांमध्ये दडलेली महागाथा साकारत असल्याचे म्हटले आहे. प्रसिद्ध निर्माते पुनीत बालन या चित्रपटाची निर्मिते आहेत.
लेखक दिग्पाल लांजेकर चित्रपटाचे लेखन करणार करणार आहेत.मात्र, चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. पुढील वर्षी म्हणजे 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असला, तरी टिझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
प्रसाद ओक याने काही दिवसांपूर्वी त्यांच्या आणखी एका चित्रपटाची ‘चंद्रमुखी’ची घोषणा केली होती. एकाच वेळी दोन चित्रपटांचे दिग्दर्शन प्रसाद ओक करणार आहेत. प्रेक्षकांसाठी ऐतिहासिक, रंजक चित्रपटांचा सोहळा ते घेऊन येत आहे.