जिल्हा नियोजन मंडळ व क्रीडा विभाग यांच्याकडून तालुक्यातील 10 गावांमध्ये व्यायामशाळांना क्रीडा साहित्य!

अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून व जिल्हा नियोजन मंडळ व क्रीडा विभाग यांच्याकडून व्यायामशाळांना क्रीडा साहित्य मंजूर झाले असून ते लवकरच 10 गावांच्या ग्रामपंचायतीच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध व्हावे व ग्रामीण भागातील होतकरू तरुणांना व्यायामाचा लाभ व्हावा त्यातून ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्तेजना मिळते खेळाडू तयार होतात ते जिल्हा राज्यस्तरीय व राष्ट्रीय विभागावर जाऊ शकतात असे मत आमदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केले. यासाठी 40 लाखांचे साहित्य 10 गावांना लवकरच प्राप्त होणार आहे.
आमदार अनिल पाटील यांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या व्यायामाची वाढती क्रेझ पाहून व्यायामाला चालना मिळावी व दर्जेदार खेळाडू ग्रामीण भागातून पुढे यावेत या उद्देशाने क्रीडा विभाग व जिल्हा नियोजन मंडळ यांच्या मार्फत काही रक्कम दिली जाते. ती रक्कम आमदार पाटील यांनी प्राप्त करून दिली आहे.
यात तालुक्यातील मेहेरगाव, मारवड, मंगरूळ, हिंगोणे बु, हिंगोणे खु प्र अ ज, पाडळसरे, लोण सिम, दोधवद, तळवाडे, मुडी प्र डांगरी ही गावे जिल्हा क्रीडा विभागाच्या निकषात बसलेली गावे आहेत. त्यांना हे साहित्य प्राप्त होणार असून याची खरेदी जिल्हा क्रीडा विभाग करत आहे. लवकरच हे साहित्य या गावांना वितरित करण्यात येणार आहे.