महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये होणार अनलॉक;पहिल्या टप्प्यात जळगाव,धुळे!

0

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारने महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामध्ये ५ टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली आहे. “सध्याच्या परिस्थितीत ५ टप्प्यांमध्ये अनलॉक केलं जाणार आहे. या ५ टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यानुसार ज्या जिल्ह्यात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल. यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकानं किंवा ट्रेन देखील सुरू होतील. जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरून एकूण ४३ भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
“पूर्ण अनलॉक लागू होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सायकलिंक ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयांना १०० टक्के मुभा, क्रीडांगणे आणि थिएटर्सला परवानगी असेल. शूटिंगला देखील परवानगी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल. लग्नसोहळ्यांना देखील १०० टक्के उपस्थितीची परवानगी असेल”, असं वडेट्टीवार म्हणाले.
➡️ कशी असेल जिल्ह्यांची वर्गवारी
▶️ पहिला गट
पहिल्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.
▶️ दुसरा गट
दुसऱ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे.
▶️ तिसरा गट
तिसऱ्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▶️ चौथा गट
चौथ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▶️ पाचवा गट
पाचव्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पाचव्या गटात कायम रेड झोन असणार आहे.

दरम्यान, आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यांची वर्गवारी ५ टप्प्यांमध्ये करण्यात आली असून यापुढे ज्याप्रमाणे जिल्ह्यांमधली करोनाची आकडेवारी बदलेल, त्यानुसार जिल्ह्यांची वर्गवारी देखील एक ते पाच अशा टप्प्यांमध्ये बदलेल, असं देखील विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!