‘तोक्ते’ चक्रीवादळ घोंगावतेय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले सतर्कतेचे आदेश!

मुंबई (वृत्तसंस्था) तोक्ते चक्रीवादळामुळे सध्या अरबी समुद्र खवळलेला आहे. त्याचा केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीच्या भागांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने या भागांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शुक्रवारी (14 मे) ऑनलाईन बैठक घेतली. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पूर्वतयारीबाबत माहिती घेतली. किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी, विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचावकार्य करावं, अशा सूचना ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.
विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज राहण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. हे चक्रीवादळ 18 मेपर्यंत गुजरात किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे.
▶️ सिंधुदुर्गामध्ये ‘अलर्ट’
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 गावामध्ये ‘अलर्ट’ घोषित करण्यात आले आहे. चक्रीवादळाने कोविड रुग्णालय वा ऑक्सिजन यंत्रणा बंद पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनरेटर सुसज्ज ठेवले आहेत. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील वेंगुर्ले, मालवण, देवगड तालुक्याला फटका बसतो.
किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे. तसेच मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. खोल समुद्रात गेलेल्या मच्छिमार बोटीदेखील किनाऱ्याकडे परतल्या आहेत.