गुड न्यूज;जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 90 टक्क्यांच्या वर

0

जळगाव(प्रतिनिधी)कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या 1 लाख 24 हजार 646 रुग्णांपैकी 1 लाख 12 हजार 356 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिलह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.14 टक्क्यांवर पोहोचले असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी प्रशासनाने राबविलेल्या माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियान व इतर उपाययोजनांमुळे जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांच्यावर पोहोचले होते. मात्र जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर 10 फेब्रुवारीपासून हे प्रमाण कमी झाले होते. तर 31 मार्च रोजी हे प्रमाण 84.92 टक्क्यांपर्यत खाली आले होते. परंतु त्यानंतरच्या काळातही जिल्हा प्रशासनाने कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या वाढविल्या होत्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार होत असल्याने आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. शिवाय मृत्युदर कमी करण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाची साखळ खंडित करण्यासाठी आजपर्यंत 9 लाख 48 हजार 708 कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 लाख 24 हजार 646 अहवाल पॉझिटीव्ह तर 8 लाख 22 हजार 99 अहवाल निगेटिव्ह आले आहे तर सध्या अवघे 208 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही कमी होत आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत 6 हजार 619 व्यक्ति होम क्वारंटाईन असून 588 व्यक्ति विलगीकरण कक्षात आहेत. जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 10 हजार 55 रुग्णांपैकी 7 हजार 432 रुग्ण लक्षणे नसलेले तर 2 हजार 623 रुग्ण हे लक्षणे असलेली आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी 1 हजार 338 रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु असून 763 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!