राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता!

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे थैमान कायम आहे. विदर्भात सूर्य आग ओकत असताना पुणे, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे. मराठवाड्याला देखील जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पुणे, कोल्हापूर, अहमदनगर येथे जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर आज येत्या 4 तासात दक्षिण- मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी पुणे, मराठवाड्यासह, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार आहे.
याचा सर्वाधिक फटका अहमदनगर, पुणे, बीड, उस्मानाबाद, लातूर, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
राज्यात सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून, उद्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वरुणराजा बरसणार आहे.
आधीच कोरोनाचा फटका राज्याला बसत असून अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान होत आहे. यातून जास्त प्रमाणात नुकसान होऊ नये अशी आशा करण्यात येत आहे.