कोरोनाच्या भीषण आपत्ती स्थितीत ‘रुग्णाश्रम’ काळाची गरज!- संयुक्त प्राप्तिकर आयुक्त डॉ.उज्ज्वलकुमार चव्हाण.

0

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या भीषण आपत्तीत रुग्णाश्रम काळाची गरज असून,सामाजिक संस्था व लोकांनी ‘रुग्णाश्रम’ साठी पुढे यावे असे आवाहन मुंबईचे संयुक्त प्राप्तिकर आयुक्त डॉ.उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी कोरोनाच्या निर्माण झालेल्या परिस्थिती वर केले आहे.
श्री चव्हाण म्हणतात, या आणि मागच्या शतकाच्या सगळ्यात भीषण संकटातून मानवसमाज जात आहे. कोरोना साथीची इतकी व्याप्ती आणि गंभीरता दुसऱ्या महायुद्धात नसेल, ना प्लेग च्या साथीत ,ना 1971 च्या दुष्काळात. प्रत्येक गावात,कानाकोपऱ्यात साथ पोहोचली आहे. व्यवस्थेवर क्षमतेच्या पलीकडचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. यात वैद्यकीय व्यवस्था, प्रशासन व्यवस्था,शासन /राजकारण व्यवस्था याच्या पलीकडे ताण जाऊन समाजव्यवस्था (सभ्यता / civilisation) यावर परिणाम होत आहे. शेवटी माणूस हा प्राणीच आहे. संकट काळात आदिम प्रेरणा ( basic animal instinct) जागृत होतात, आणि माणूसपण हरवायला लागते. सध्याचा असाच काळ आहे. चेंगराचेंगरी होते तेव्हा माणसे खाली पडलेल्या माणसांच्या छातीवर पाय देऊन पळतात. तेव्हा माणूसपण हरवते आणि पशुत्व जागे होते. Healed femur is considered as first sign of civilisation. सभ्यतेच्या उत्क्रांतीमध्ये पाहिले चिन्ह “जुळलेले मांडीचे हाड” मानले जाते. प्राण्यामध्ये ज्या प्राण्यांचे मांडीचे हाड तुटते तो प्राणी अन्नपाण्या अभावी मरतो किंवा त्याला शिकारी खाऊन टाकतो. जुळलेले मांडीचे हाड दर्शवते की हाड मोडल्याच्या कालावधीत कोणीतरी दुसर्‍याने खाण्यापिण्याची आणि रक्षणाची जबाबदारी घेतली. इथून सभ्यता ( civilisation) सुरू होते. मानवाच्या पुढच्या प्रगतीची सगळी कारणे “एकमेकांना सहाय्य करणे” यात सापडतात. यातूनच सर्व व्यवस्थांचा उगम होतो. वैद्यकीय व्यवस्था,प्रशासन व्यवस्था, शासन/ राज्यव्यवस्था आणि इतर सगळ्याच व्यवस्था आणि यंत्रणा.
रुग्णासंख्या इतकी वाढली की खेडेगावात आता सध्या कोणतीच व्यवस्था आणि यंत्रणा सोयी पुरवू शकत नाही. (तशीही आपली वैद्यकीय व्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था पुढारलेल्या देशांच्या तुलनेत “तकलादू ” म्हणता येईल अशीच होती. यातही महाराष्ट्रात “बरी” म्हणावी अशी व्यवस्था आहे. इतर राज्यात तालुक्याला साधा MBBS डॉक्टर मिळणे कठीण आहे)गरिबांना घरात वेगळी खोली मिळणे आणि इतरांना संसर्ग न होणे कठीण आहे. जो रुग्ण आहे त्याला कुठे ठेवायचे , हा फार मोठा प्रश्न झाला आहे.घरी ठेवू शकत नाही, हॉस्पिटलमध्ये जागा नाही, असली तर 50,000 ते 1,00,000 रुपये खर्च करण्याची क्षमता नाही. असली तरी एकच जण आजारी पडला असेही नाही. सगळे घरच आजारी पडत आहे.”नवरा औरंगाबाद ला भरती, बायको जळगाव ला भरती. घरात दोन लहान मुले कोरोना पॉझिटीव्ह.त्यांचे खाण्यापिण्याचे हाल. नवरा मेला. बायकोला अजून सांगितले नाही. ” असे उदाहरण बरेच आहेत.”म्हातारे माणूस आजारी पडले. त्याला शेतात झाडाखाली खाट टाकून दिली.डबा, औषधे शेतातच. मेला तिकडेच, जाळला पण तिकडेच. ना अंत्यविधी ना दहावे.” हे असे प्रसंग घडत आहेत. काय करणार. नाईलाज होतोय लोकांचा. पर्याय नाही. दुष्काळाच्या वर्षात जनावरांना कमीत कमी चारा छावण्या तरी मिळतात. लोकांना तोही पर्याय सध्या नाही. बेड न मिळणे,औषध न मिळणे,ऑक्सिजन न मिळणे यासाठी ओरड करणाऱ्या शहरी समाजगटापेक्षा हा ग्रामीण समाजगट वेगळा आहे. कमी खर्चात राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय व्हावी इतकी माफक अपेक्षा आहे.
सध्या काही काळ याची प्रचंड मोठी गरज निर्माण झाली आहे.
याचे सर्वात साधे उदाहरण आहे – लंगर. शीख समाज याबाबतीत आदर्श आहे. Community kitchen / सार्वजनिक उपहारगृह आणि सोबत राहण्याची व्यवस्था असावी. जैन समाजाने मुलुंड ला कोविड केअर सेन्टर सुरू केले. पैसा आहे आणि चांगली इच्छा पण आहे, त्यातून असे सुंदर काम उभे राहते. शेतकरी , शेतमजूर लोकांसाठी “रुग्णाश्रम” सुरू होऊ शकतात का , असा प्रश्न आहे. समाज म्हणून आपण स्थानिक पातळीवर प्रश्नाला कसे सामोरे जातो यावर लोकांची सोय गैरसोय अवलंबून आहे. याची गरज गावागावात आहे. पण कमीत कमी तालुक्याला तरी असावेत. दिवसाला 400-500 रुपयात राहणे , 4 वेळा जेवण आणि स्वच्छता या सोयी मिळाव्यात. औषधे रुग्ण स्वतःच घेतील. उपचाराची जबाबदारी अशा रुग्णाश्रमानी घ्यायची गरज नाही. जर ऑक्सिजन लेवल 95-90 पेक्षा कमी झाली तर रुग्णाला रुग्णालयात किंवा घरी जाऊ द्यावे.
यामुळे घरातले इतर लोक बाधित होणार नाही, गल्ली बाधित होणार नाही. संसर्ग कमी झाला तर साथ कमी होईल. सध्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, त्यावरचा ताण कमी होईल.
यात अडचणी ही बऱ्याच आहेत. जर रुग्णाश्रमात रुग्ण दगावला तर काय करायचे. सरकारी धोरणानुसार अशी व्यवस्था नेमकी कोणत्या निकषांवर असावी. कोविड केअर सेंटर(CCC) आणि district covid hospital (DCH) यांचे निकष वेगळे आहेत कारण उद्दिष्टे वेगळे आहेत. विलगिकरण केंद्र ( isolation/ quarantine centre) सारखे हे रुग्णाश्रम असतील. पण यातही विलगिकरण केंद्रात संशयित रुग्ण असायचे. रुग्णाश्रमात ज्यांचे पक्के निदान झाले आहेत असे रुग्ण असतील. प्रशासनाने रुग्णाश्रम पुरवायची गरज पूर्ण नाही केली तरी लोकांचे काही म्हणणे नाही. पण यासाठी निकष लावून जे लोक सेवाभावाने हे करतील त्यांच्या अडचणी वाढवू नयेत.
यासाठी समाजमनाचीही तयारी करावी लागेल. लोक प्रशिक्षित नाहीत. जो मदत करतो त्यांच्याशीही भांडू शकतात. जे डॉक्टर जीव धोक्यात घालून उपचार देतात त्यांना मारतात. अशा भांडखोर आणि मूर्ख लोकांमुळे समाजसेवी संस्था, लोक पुढे यायला घाबरतात. पैसे देणे, गोळा करणे एकवेळ सोपे आहे. गावागावात लाखो रुपये खर्च करून गणपती, सप्ताह, देवी बसवतातच ना. पण अशी सेवा देणारी, “ना नफा ना तोटा” तत्वावर चालणारी व्यवस्था उभी करणे गरजेचे असून कठीण होते.रुग्णाश्रम उपचार केंद्र नाहीत, हे समजवावे लागेल. ज्याला समजले त्यालाच सोय द्यावी लागेल. उपचाराची अपेक्षा असेल तर रुग्णाश्रमात न घेतलेले बरे. घरी असण्यापेक्षा रुग्ण इथे असलेला बरा, एवढंच लोकांना वाटावं.
प्रत्येक तालुक्यात हजारो रुग्णांची ही गरज आहे. लोकांनाच स्वतःहून गणपती मंडळ जसे काम करते तसे हे सुरू करावे लागेल. शाळा , कॉलेज, हॉस्टेल, मंदिर, मंगल कार्यालय, लॉन, बंद फॅक्टरी हे तात्पुरते राहण्याची व्यवस्था म्हणून वापरता येतील. Community kitchen/ लंगर सुरू करावे लागतील. एकदा हे कुठेही यशस्वीपणे सुरू झाले तर गावागावात आणि तालुका- तालुक्यात आपोआप पसरत जाईल.
शासन प्रशासनावरचा ताण कमी होईल आणि समाज म्हणून आपले मूल्य टिकून राहतील.
सब्बे सत्ता सुखी होन्तु, सब्बे होन्तु च खेमिनो।
सब्बे भद्राणि पस्सन्तु,मा किन्चि पापमागमा, मा किन्चि दुक्खमागमा।।

सर्व प्राणी सुखी व्हावे, सर्व कुशल-क्षेम युक्त व्हावेत। सर्व शुभ पाहो। कोणी पापाचा भागी न बनो, कोणाला ही कोणतेही दु:ख प्राप्त न हो।

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!